Sunday, September 8, 2024
Homeनगरकाँग्रेस फुटीच्या बातम्या खोट्या; बाळासाहेब थोरात यांचे स्पष्टीकरण

काँग्रेस फुटीच्या बातम्या खोट्या; बाळासाहेब थोरात यांचे स्पष्टीकरण

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

काँग्रेस पक्षात फूट पडणार असल्याच्या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत, असे स्पष्टीकरण काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळसाहेब थोरात यांनी सोमवारी दिले. काँग्रेस पक्ष एकजूट असून जनविरोधी सरकारच्या विरोधात आम्ही संघर्ष करत राहू, अशी ग्वाही थोरात यांनी दिली आहे.

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा वगळता चार राज्यांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या या पराभवामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेच्या पाठोपाठ राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा कायम राहण्याची चिन्हे असल्याने काँग्रेस आमदारांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील आमदारांचा एक गट भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. तशा बातम्या माध्यमांनी प्रकाशित केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी काल एक्स या समाज माध्यमावर खुलासा केला आहे. विरोधी पक्ष एकजुटीने लढतो आहे. अशावेळी संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने काँग्रेस फुटीच्या बातम्या काही मंडळींकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहे. माध्यमेही त्याला प्रसिद्धी देत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील काँग्रेस संदर्भातील या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

ट्रिपल इंजिन सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारमध्ये सुरू असलेल्या बेबंदशाहीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. महागाई आणि बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर आहे. या सर्व नकारात्मक वातावरणात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, असे थोरात यांनी एक्समध्ये नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या