संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
पंतप्रधानांनी पदाची गरिमा जपणे आवश्यक असते. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी सहा महिन्यांत महाराष्ट्रात अवघ्या तीन सभा घेतल्याचा इतिहास आहे. मात्र, सध्याचे पंतप्रधान महाराष्ट्रात दिवसाला तीन सभा घेत आहे. यावरुन महाराष्ट्रच नाही तर देशही मिळवणे सत्ताधार्यांना अवघड आहे. जनता योग्य निर्णय देईल. आता काहीही असले तरी महाविकास आघाडी चाळीसपेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास मतदान केल्यानंतर माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील जोर्वे या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आमदार थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशाच्या दृष्टीने हा लोकशाहीचा उत्सव असतो. त्यामुळे तितक्याच निष्ठेने आणि आनंदाने हा साजरा केला पाहिजे. हा चौथा टप्पा महाराष्ट्रात असून, लवकरच मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होतील. चार तारखेला नवीन सरकार बनणार आहे. पुढील सरकार हे लोकशाही व राज्यघटनेला जपणारे असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एकंदर राज्यातील चित्र पाहिले असता राज्यात महाविकास आघाडीला तर देशातही इंडिया आघाडीला अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिला रिपोर्ट समोर येतो तेव्हा मतदानाची टक्केवारी कमी दाखवली जाते, तर अकरा-अकरा दिवस गेल्यानंतर पुन्हा मतदानाची टक्केवारी वाढून येते या गोष्टी काळजीच्या वाटतात. त्यामुळे सर्वकाही पारदर्शक असावी, कुठेही शंकेला कारण नसावे असे म्हणाले.