Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्या“देवेंद्र फडणवीसांचा ‘अडवाणी’ केला, फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या…”; काँग्रेस नेत्यानं डिवचलं

“देवेंद्र फडणवीसांचा ‘अडवाणी’ केला, फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या…”; काँग्रेस नेत्यानं डिवचलं

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली. तर भाजपाकडे १०५ आमदार असूनही देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं, या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी टिप्पणी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रातील भाजपाच्या मदाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा ‘अडवाणी’ केल्याची टीका कन्हैया कुमार यांनी केली. दरम्यान, त्यांनी अमृता फडणवीसांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली.

आजकाल देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या (अमृता फडणवीस) गाण्याचे व्हिडीओ जास्त बघितले जातात. मला फडणवीसांची दया येते,अशा शब्दांत कन्हैया कुमार यांनी खिल्ली उडवली. देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन,’असं म्हणत होते. पण केंद्रातल्या त्यांच्या मदाऱ्यांनी त्यांचा पार ‘अडवाणी’ केला आहे. १०५ आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवून स्वत: त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावं लागत आहे. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये कोणतं डिटर्जंट वापरतात की पक्षात येण्याआधी भ्रष्ट असलेला नेता भाजपामध्ये येताच अचानक पवित्र होतो, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

कन्हैय्या यांनी मुंबईने आपल्याला किती भरभरून दिलं आहे, याची आठवण सांगितली. आपल्या मुंबई दौऱ्यात विविध कार्यक्रमांना पोलिसांकडून आडकाठी केली जात आहे. त्यात पोलिसांचा दोष नाही. ठरावीक नेत्यांचे तळवे चाटणं, म्हणजे देशसेवा अशी धारणा आजकाल झाली आहे. पण या नेत्यांचे पगार, भत्ते लोकांनी भरलेल्या करातून निघतात. त्यामुळे हे लोक सामान्य जनतेला उत्तरदायी आहेत, हे त्यांना विसरून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसमध्ये आल्यापासून भाजपचं आमच्यावरचं प्रेम खूप वाढलं आहे. पण ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नची फिरकी खेळण्याची सवय झाली होती, त्याचप्रमाणे मलाही जय शाह यांच्या वडिलांची गुगली खेळता येते, असा शालजोडीतला टोलाही त्यांनी हाणला.

एकीकडे पंतप्रधान ‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा करतात आणि दुसऱ्या बाजूला मुंबईत पुनर्विकासाधीन असलेल्या लोकांना पात्रता निकष लावतात. समजा सगळे आपलेच असतील, तर मग हा पात्रता निकष कशासाठी, असा प्रश्न कन्हैय्या यांनी विचारला. धारावी पुनर्विकास प्रकल्पात हजारो लोकांना पात्रता निकष लावून बाद ठरवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी आज विद्यार्थ्यांसाठी खास अॅपची घोषणा केली. वास्तविक या असल्या चमकदार घोषणा करण्याऐवजी पंतप्रधानांनी त्यांनीच दिलेलं दर वर्षी दोन कोटी रोजगारांचं वचन प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे. आपल्या देशाच्या एकूण अर्थसंकल्पापैकी १० टक्के रक्कमही शिक्षणावर खर्च होत नाही. सरकारला शिक्षणाचं खासगीकरण करायचं आहे. हे सर्वसामान्यांना परवडणार नाही. मुलांच्या शाळेची फी, गणवेश, वह्यापुस्तकं आणि इतर गोष्टींमध्येच पालकांचा प्रचंड खर्च होतो. हे सगळं एका बाजूला असताना दुसरीकडे देशात विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. देशात दर तासाला एक विद्यार्थी आज आत्महत्या करत आहे. पण त्याबाबत कोणालाच काहीच पडलेलं नाही, अशी टीकाही कन्हैय्या यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या