Sunday, September 8, 2024
Homeनगरजिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला जास्तीत जास्त जागा घेण्याचा प्रयत्न

जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला जास्तीत जास्त जागा घेण्याचा प्रयत्न

आमदार बाळासाहेब थोरात यांची ग्वाही || राज्यात पुन्हा महाआघाडीचे सरकार येणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण, नगर उत्तरेसह राज्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीसाठी मोठे प्रयत्न केले. यामुळे महाविकास आघाडीला यश मिळवणे शक्य झाले आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची समन्वय समितीची बैठक होणार असून त्यात नगर जिल्ह्यासाठी जास्तीजास्त जागा घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली.

- Advertisement -

नगरमध्ये गुरूवारी काँग्रेसच्यावतीने आयोजित महासंकल्प मेळाव्यात आ. थोरात बोलत होते. यावेळी खा. नीलेश लंके, आ. कानडे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे, हेमंत ओंगले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. थोरात म्हणाले, लोकसभा निवडणूक सोपी नव्हती, दक्षिणेत शरद पवार यांची राष्ट्रवादीचा तर उत्तरेत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. मात्र, या दोन्ही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांचे योगदान मोठे आहे. दोन्ही ठिकाणच्या विजयात काँग्रेसचा वाटा मोठा आहे. नगर दक्षिणेत तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची लढतच नाही, उमेदवार तूल्यबळ नाही, असे म्हणत होते.

मात्र, जनमत मागे असल्यावर काय होते हे सर्वांनी पाहिले आहे. नगर उत्तरेत देखील वेगळी परिस्थिती नव्हती. त्याठिकाणी मोठ्या धनशक्ती विरोधात लढा देत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. संपूर्ण राज्यात काँग्रेस कार्यकर्त्यामुळे महाविकास आघाडीला यश मिळाले, असे आ. थोरात म्हणाले. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीबाबत महाविकासच्या बैठकीत चर्चा होईल. त्यासाठी समन्वय समिती असून त्या समितीशी चर्चा करून जिल्ह्यासाठी जास्त जागा घेण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

1 हजार 500 म्हणजे लाच देण्याचा प्रयत्न
महायुती सरकार 1 हजार 500 रुपये देऊन जनतेची फसवणूक करत आहे. एकीकडे जीएसटीच्या रूपाने पैसे वसूल करतात. साधी काडीपेटी घेतली तरी त्यावर जीएसटी आहे. महागाई वाढली आहे. अशा स्थितीत जनतेला 1 हजार 500 रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न होतो आहे, पण आता जनता त्याला फसणार नाही, असे आ. थोरात यांनी स्पष्ट केले.

सरकारच भ्रष्ट
50 खोके एकदम ओके ही घोषणा गाव पातळीवर पोरांपर्यंत पोहोचली आहे, पण पैसे देऊन आलेले हे सरकार जनतेला मान्य नाही. 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून दोन दिवसात त्यांना मंत्री केले जाते. भ्रष्ट पद्धतीने मंत्रिमंडळ आले असून सरकारच भ्रष्ट आहे. धनदांडगे व सत्ताधार्‍यांची मुले सामान्यांना चिडत आहेत. गेल्या दोन महिन्यांत या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. दुसरीकडे अमली पदार्थांचा धुमाकूळ सुरू आहे. भरती पेपर फुटत आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अहंकाराला जनतेने धडा शिकवला आहे, असा दावा थोरात यांनी केला.

नगर शहर भयमुक्त करणार
नगर शहरात काँग्रेसच्या कार्यक्रमाला माणसे उपस्थित राहणे अवघड असते. दहशत, दादागिरी, भीतीचे वातावरण असते. अशा स्थितीत आजच्या मेळाव्याला आलेले शूरवीर आहेत. नगर भयमुक्त करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मागील दहा वर्षांत शहराची रया गेली आहे. रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. तिकडे रोज एमआयडीसीच्या घोषणा होतात, पण नगरच्या एमआयडीसीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आ. थोरात यांनी केला.

मंत्रालय म्हणजे भ्रष्टाचाराचा आगार
जनतेचा पैसा कसा ओरबडता येईल? अशी परिस्थिती सध्या राज्यात सुरू आहे. मंत्रालय म्हणजे भ्रष्टाचाराचे आगर झाले आहे. कामापेक्षा टक्केवारीची चढाओढ सुरू आहे. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे. राज्यातील अनेक जमीन घोटाळे आम्ही विधानसभेत काढले. हजारो कोटींची जमीन आदानीला कवडीमोल दरात देण्यात आली. यामुळे आता सर्वसामान्यांनी कोणाकडे पाहावे, असा प्रश्न असल्याचे आ. थोरात यांनी स्पष्ट केले.

भाजपचा घमेंड जिरवला
लोकसभा निवडणुकीत सर्वच म्हणायचे भाजच विजयी होईल. मात्र, मतदारांनी चित्रच उलटे करून दाखवले. हे फक्त जनताच करून दाखवते. देशपातळीवर निवडणुकीत भाजपची घमेंड, अहंकार जनतेने जिरवून दाखवला, या शब्दांत त्यांनी भाजपचा समाचार घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या