Tuesday, January 6, 2026
Homeराजकीय"भाजपचा पराभव करण्यासाठी सोबत येऊ, पण…"; काँग्रेसकडून मनसेबाबत मोठं विधान

“भाजपचा पराभव करण्यासाठी सोबत येऊ, पण…”; काँग्रेसकडून मनसेबाबत मोठं विधान

मुंबई । Mumbai

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षामध्ये मोठे राजकीय नाट्य रंगले आहे. एका बाजूला मुंबईतील स्थानिक नेतृत्व ‘स्वबळाचा’ नारा देत असताना, दुसरीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा देत सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजपला हरवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) आघाडी करण्यावरून काँग्रेसच्या नेतृत्वात दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत, ज्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या मुंबईतील नेतृत्वाने स्पष्टपणे मनसे सोबत युती करण्यास नकार दिला आहे. मुंबईतील एका चिंतन शिबिरानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘स्वबळावर’ लढण्याचा नारा दिला होता. खासदार वर्षा गायकवाड यांनीही मनसेवर अप्रत्यक्ष टीका करत “मारहाण करणाऱ्या, गुंडागर्दी करणाऱ्यांसोबत आमचा पक्ष कधीही जाणार नाही,” अशी भूमिका जाहीर केली होती, ज्याला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही दुजोरा दिला होता.

YouTube video player

या स्पष्ट भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘आघाडीत लढले पाहिजे’ या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे आणि काँग्रेस त्या दिशेने सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या ‘सत्याच्या मोर्चात’ महाविकास आघाडी सोबतच मनसे नेही हिरीरीने सहभाग घेतला होता. इतकेच काय, या मोर्चासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनुपस्थित असले तरी पक्षाच्या बड्या नेत्यांनी या मोर्चात सहभाग नोंदवला होता. या निमित्ताने भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा सूर आळवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वडेट्टीवार यांनी याच एकत्रित लढण्याच्या भूमिकेवर जोर दिला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी ‘सत्याचा मोर्चा’ हा केवळ मतचोरी संदर्भात नसून लोकशाही वाचवण्यासाठी होता, असे स्पष्ट केले. त्यांच्या मते, “आयडिओलॉजीचा प्रश्न महत्त्वाचा असतो.” या वक्तव्यावरून, भाजपविरोधी लढ्यात मनसेसोबत तात्पुरती जुळवून घेण्याची भूमिका काँग्रेसमधील एका गटाने घेतल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने महापालिकेसाठी केलेल्या एका कथित सर्वेक्षणावर विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. भाजपने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबई महापालिकेत भाजप दणदणीत विजय मिळवणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले होते. यावर वडेट्टीवार म्हणाले की, हा भाजपने निर्माण केलेला एक काल्पनिक कथाभाग आहे. “लोकांचे परसेप्शन बदलविण्यासाठी भाजपने केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.”

वडेट्टीवार यांनी मतदारांना धमकावून व यंत्रणेचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा भाजपवर आरोप केला. त्यांनी स्पष्टपणे म्हटले, “दादागिरी, गुंडगिरी, पैसा, दबावतंत्र आणि यंत्रणेचा वापर करून भाजपने १०० नगरसेवक बिनविरोध केले आहेत.” ईव्हीएम आणि मतदारांची नोंदणी याबद्दल बोलताना वडेट्टीवार यांनी लोकशाही धोक्यात असल्याचा गंभीर आरोप केला. “काल मुंबईत अनेक मतदार ओळखपत्र मिळाले आहेत. त्यामुळे भाजपला वाटत असावं, जे बिहारमध्ये केले ते मुंबईत करून दाखवू. त्यांना लोकशाही संपवायची आहे,” अशी टीका त्यांनी केली.

भाजपच्या ‘महाविकास आघाडी किंचित उरेल’ या विधानावर पलटवार करताना त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे आव्हान दिले. “इमानदारीने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, सर्व समोर येईल,” असे वडेट्टीवार म्हणाले. सत्ता आणि यंत्रणांचा गैरवापर करून लोकशाही पायदळी तुडवल्या जात असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. एकंदरीत, मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसमध्येच ‘स्वबळ’ आणि ‘महाविकास’ आघाडी या दोन परस्परविरोधी विचारांचा संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे. मनसे सोबत जाण्याच्या मुद्द्यावरून स्थानिक आणि वरिष्ठ नेतृत्वात असलेले हे मतभेद निवडणुकीच्या अंतिम रणनितीवर मोठा परिणाम करू शकतात.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...