Sunday, November 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेस २८८ जागा स्वबळावर लढणार? आमदाराच्या दाव्याने मविआत नवा ट्विस्ट

काँग्रेस २८८ जागा स्वबळावर लढणार? आमदाराच्या दाव्याने मविआत नवा ट्विस्ट

नागपूर | Nagpur
राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. मात्र आता विधानसभेवरुन राज्यात मोठा भाऊ-छोटा भाऊ असा वाद सुरु झाला आहे. त्यातच ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असून मविआने विधानसभा देखील एकत्र लढण्याचे निश्चित केले असतानाच आमदार अभिजीत वंजारी यांनी केलेल्या एका विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिजीत वंजारी यांनी उध्दव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत काय करायचं हा प्रश्न आमच्या लेव्हलचा नाहीये. महाविकास आघाडीचे नेतेच ते ठरवतील. पलिकडे तीन पक्ष आहेत. इकडेही तीन पक्ष आहेत. जागा वाटप करताना अनेकदा चांगल्या कार्यकर्त्यांचं नुकसान होते. त्यामुळे जर २८८ जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा विचार आला तर नक्की लढले पाहिजे, असे अभिजीत वंजारी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच ते पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं मोठा पक्ष ठरला,” असा टोलाही त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला. काँग्रेसने स्वतंत्र लढावे यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा बूथ स्तरावरील आढावा घेऊन तो हायकमांडकडे पाठवणार असल्याचे वंजारी यांनी सांगितले.

“काँग्रेसचे अधिक आमदार निवडून आले तर नाना पटोले मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी आमची तयारी आहे. प्रि पोल किंवा पोस्ट करायचे हे ठरवावे लागतील, पण मुख्यमंत्री नाना पटोले व्हावे ही आमची इच्छा आहे,” असेही आमदार वंजारी यावेळी म्हणाले. दरम्यान, काँग्रेस आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

उध्दव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत जिल्हाप्रमुखांनी घेतलेल्या कष्टाबद्दल अभिनंदन केले. विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यावर आहेत. दिवस फार कमी आहे. त्यात पाऊस आणि शेतीची कामेही आहेत. असे असले तरी आपली संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा. आतापासूनच विधानसभेची तयारी करा. सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांची तयारी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे काँग्रेसमधून ही प्रतिक्रिया उमटली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या