Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगसंवर्धन मराठीचे

संवर्धन मराठीचे

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…

मराठी भाषेतील मुळाक्षरे अ पासून सुरू होतात व ज्ञ पर्यंत संपतात. लहान मूल बोलू लागले की पहिला शब्द आई असेच बोलते. मातृभाषा ही आपोआपच व्यक्त होत असते. मातृभाषा यायला पाहिजे की नाही हा प्रश्नच निर्माण होत नाही. घरातील वातावरणात मुले सहजपणे ही भाषा बोलू लागतात.. रूळू लागतात. आकलनशक्तीने त्यांचा शब्दसंग्रह वाढतो नि त्यांचे मिठास बोल अधिकच भावू लागतात.

मुलांना शाळेत घालताना प्रत्येक पालक विचार करतो, आपल्या अपत्याला मराठी की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचे? खरे तर मराठी भाषेतील मुलेही उत्तम ज्ञान ग्रहण करून उच्चशिक्षण घेतात. अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले तर मुले व्यवस्थित आपले भविष्य घडवू शकतात.

- Advertisement -

मातृभाषेत शिकणारी मुले ध्येयवादी असतात कारण त्यांनी आपल्या घरातील मराठी वातावरणाचा नकळत अभ्यास केलेला असतो. शेतकर्‍यांच्या मुलांना तर शिकून आपल्या घरादाराचा विकास करायचा असतो इतका त्यांच्यात आत्मविश्वास असतो. ही मुले परिस्थितीबरोबर झटतात. रात्रंदिन व दोन पावले पुढे जाऊन मार्कही मिळवतात . मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळेत घातले तर पालकांना एका गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इंग्रजीबरोबर आपण स्वतः पुढाकार घेऊन मराठीचे संवर्धन केले पाहिजे. त्यांना इंग्रजीबरोबर मराठी भाषेतीलही चांगली पुस्तके आणून द्यावीत म्हणजे मराठीचेही असाधारण महत्त्व त्यांच्या लक्षात येईल. दोन्ही भाषांमधे उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध आहेत . माझ्याकडे दोन्ही भाषांतील ग्रंथसंपदा आहे. या दोन्ही भाषा आजच्या काळात महत्त्वाच्या आहेत. आपल्या मराठी भाषादिनी म्हणजेच 27 फेब्रुवारीला शाळांमध्ये ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाते व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले जाते. ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना कुसुमाग्रज यांनी आपल्या मराठी भाषेचा गौरव तर केलाच पण त्यांनी सांगितले की, मराठी ही आपली आई आहे तर इंग्रजी ही आपली मावशी आहे, म्हणजेच त्यांनी मराठीबरोबर इंग्रजीचेही महत्त्व विशद केले होते. आपण जसे आईवर प्रेम करतो तसेच मावशीवरही करतो इतके सोपे करून त्यांनी सांगितले.

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जपल्या, दर्‍याखोर्‍यातील शिळा.

आपल्या मातृभाषेचे मुलांना सर्वतोपरी चांगले ज्ञान देऊन तिचे संवर्धन करायला हवे. त्यासाठी घरात मराठीची पुस्तके पाहिजे. वाचनाची आवड मुलांना लागली तर त्यांच्या ज्ञानात भर पडते व त्याचा उपयोग शाळेत निबंध किंवा कवितेचे रसग्रहण करतानाही होतो. यातूनच निर्माण होतील उद्याचे लेखक आणि कवी. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान मुलांकडून पाठ करून घ्यावे. त्याने मनाची एकाग्रताही वाढते. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वर महाराजांनी केला आहे.

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच वाटते की आपली मुले पुढे गेली पाहिजेत. त्यासाठी त्यांना मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व कसे मिळवून देता येईल याचा विचार करून तो प्रत्यक्षात आणायला हवा.

मुलांचे भविष्य घडवणे आपल्या हातात आहे. फक्त आपण आवर्जून त्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा.

मराठी भाषेविषयी जागरुकता निर्माण करून भाषेविषयी त्यांचे प्रेम वाढवूया.

क्रमशः

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या