Monday, November 25, 2024
Homeब्लॉगकॉन्स्टॅंटिनोपल गमावले अन् अमेरिकेला पोहचले

कॉन्स्टॅंटिनोपल गमावले अन् अमेरिकेला पोहचले

मानवी जीवनातील समस्या याच त्याने लावलेल्या शोधांचा उगम निश्चित करत असतात. भौतिक समृद्धीसाठी माणसाची धडपड ही कायमच आत्मिक समृद्धीसाठी केलेल्या धडपडीपेक्षा अधिक राहिली आहे. भौतिक समृद्धीचा अतिरेक असला किंवा संपूर्ण अभाव असला तरच माणूस आध्यात्माचा आधार शोधतो. अन्यथा भौतिक समृद्धी वृद्धिंगत करण्यात तो व्यस्त असतो. युरोपातील देश पंधराव्या शतकात ऐश्वर्य व संपन्नता यांचा उपभोग घेत होते. त्याचा प्रमुख आधार पूर्वेकडील देशांशी असलेला त्यांचा व्यापार होता. परंतु सन १४५३ मध्ये तुर्कांनी कॉन्स्टॅंटिनोपल शहरावर वर्चस्व मिळवले. यामुळे युरोप व आशिया यांच्या दरम्यानचा भूमार्गाने होणारा व्यापार बंद होण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे युरोपीयन देशांना पूर्वेशी होणारा व्यापार अबाधित ठेवण्यासाठी नवीन मार्गाचा शोध घेणे अपरिहार्य ठरले. हा नवीन मार्ग जलमार्गच असू शकत होता.

युरोपला नव्या मार्गाचा शोध घ्यायला भाग पाडणारे आणि त्यामुळे जगाच्या कॉन्स्टॅंटिनोपल शहराचे राजकिय व भौगोलिक महत्व पाहणे अपरिहार्य ठरते. इ.स.३२४ मध्ये रोमनसम्राट कॉन्स्टंटाइन प्रथम याने रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथून कॉन्स्टॅंटिनोपल येथे हलवल्यानंतर ग्रीस हे पश्चिम रोमन साम्राज्याचे केंद्र झाले. पुढे रोमन साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर पूर्व रोमन साम्राज्य हे बायझेंटाईन साम्राज्य म्हणून ओळखू जाऊ लागले. याची राजधानी कॉन्स्टॅंटिनोपल आणि राजभाषा ग्रीक होती. याच काळात बायबलाची रचना झाली व ख्रिश्चन धर्म हा बायझेंटाईन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला. बायझेंटाईन राज्य हे आफ्रिका, मध्य युरोप, पर्शियापर्यंत पसरले होते. अनेक प्रांत या साम्राज्यात असले तरी या साम्राज्याची ख्रिश्चन धर्मीय म्हणून ओळख होती. बेलारियस व तिसरा लिओ यांसारख्या महान सेनांनीनी हे साम्राज्य विस्तारले.

- Advertisement -

इस्लामाचा उदय झाल्यानंतर इस्लामी फौजांचे पहिले आक्रमण बायझेंटाईन साम्राज्यावर झाले. त्यात त्यांना आफ्रिका व मध्यपूर्वेकडचा भाग गमवावा लागला. तुर्कांचे आक्रमण होईपर्यंत पुढील अनेक वर्षे युरोपातील भूप्रदेश बायझेंटाईन साम्राज्याने टिकवून ठेवले. दरम्यान इ.स.च्या १० व्या शतकात बायझेंटाईन ख्रिस्ती धर्माधिकार्‍यांचे व रोमच्या ख्रिस्ती धर्माधिकार्‍यांचे मतभेद टोकाला गेले, रोम व ग्रीसमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण् झाली. ग्रीसचे ख्रिस्ती लोक स्वतःला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले. बायझेंटाईन साम्राज्याचा प्रभाव ग्रीस व सभोवतालच्या देशांवर ११०० वर्षांपर्यंत राहिला.

बायझेंटाईन साम्राज्याने युरोपावर होणारे इस्लामी आक्रमणे अनेक शतकांपर्यंत थोपवून धरली होती. परंतु सरतेशेवटी ईस्लाम धर्मीय ओस्मानी म्हणजेच ऑटोमन साम्राज्याने कॉन्स्टॅंटिनोपलाचा पाडाव केला व ११०० वर्षांची एकछत्री सत्ता संपुष्टात आणली.सन १९३० मध्ये या शहराचे नाव इस्तंबूल असे करण्यात आले. बोस्फोरस किंवा इस्तंबूलची सामुद्रधुनी ही युरोप व आशिया ह्यांची सीमा ठरवणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी मार्माराच्या समुद्राला काळ्या समुद्रासोबत जोडते.

बोस्फोरसव डार्डेनेल्झ ह्या तुर्कस्तानमधील सामुद्रधुन्या जलवाहतूकीसाठी वापरले जाणारे सर्वात अरुंद जलमार्ग आहेत. ह्या दोन सामुद्रधुन्यांमार्फत काळ्या समुद्रापासून एजियन समुद्रापर्यंत पर्यायाने भूमध्य समुद्रापर्यंत जलवाहतूक शक्य होते.बोस्फोरसच्या दोन्ही किनाऱ्यांवर इस्तंबूल शहर वसले आहे.

इस्तंबूल हे नैसर्गिक व अत्यंत सुरक्षित बंदर म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध होते. तसेच युरोप व आशिया यांना जोडणारा एकमेव भूमार्ग या शहरातून जात होता. युरोप आणि आशिया यांना जोडणारा हा सर्वात निकटचा भूमार्ग होता. जगाचा नकाशा दृष्टिसमोर ठेवल्यास या भूमार्गाचे आणि इस्तंबूल शहराचे महत्व लक्षात येऊ शकते. अशा सर्व कारणांनी राजकीय, लष्करी व व्यापारी अशा सर्व अंगांनी हे शहर अत्यंत महत्वाचे ठरले. सुमारे हजार वर्षे हे शहर युरोपातील सर्वात मोठे व श्रीमंत शहर म्हणून आपली ओळख टिकवून होते. रोमन राज्यकर्त्यांचा पराभव करून तुर्कांनी हे शहर काबीज केल्यानंतर, युरोप व आशिया यांच्यातील अनेक समीकरणं बदलली.

ख्रिश्चन व ईस्लाम धर्मातील वैरामुळे या घटनेला धार्मिक रंग देखील होताच. यामुळेच कॉन्स्टॅंटिनोपलाच्यापाडावामुळे ख्रिश्चन युरोपासमोर आशियायी देशांशी व्यापारात निर्माण झालेला अडथळा, हा नवीन जलमार्गांच्या शोधाचे कारण बनला. तसेच नवीन जलमार्गांचा शोध घेण्याचा प्रयत्न अमेरिका-ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या नवीन भूखंडांच्या शोधांना कारणीभूत ठरला. व्यापाराचे अनन्यसाधारण महत्व जाणलेल्या युरोपात भांडवलशाहीची पायाभरणी होत होती. अशावेळी इटालीयन व पोर्तुगीज दर्यावदींनी नवीन जलमार्गांच्या शोधाचे आव्हान स्वीकारले.

साहसी दर्यावदींच्या साहस व प्रबळ ईच्छा शक्तीला पाठबळ देण्याचे काम पोर्तुगाल आणि स्पेनच्या राजांनी केले. या राजांनी व्यापार व धर्मप्रसार यांची सांगड घातली आणि नाविकांच्या जलमार्ग शोधण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. पोर्तुगालचा सम्राट जॉन द्वितीय याने जहाजांचा एक मोठा ताफा तयार करून घेतला. बार्तुलुम्यू दियास या दर्यावदीच्या नेतृत्वात भारताकडे जाणार्‍या जलमार्गाचा शोध घेण्याची योजना आखली. योजनेनुसार आफ्रिकेच्या किनार्‍याला धरून भारतापर्यत पोहचण्याचा बेत होता. सन १४८७ मध्ये बार्तुलुम्यू दियासच्या नेतृत्वात हा ताफा भारताच्या शोधार्थ निघाला.

इ.स.१४८८ सालातल्या मे महिन्यात बार्तुलुम्यू दियास आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यत पोहचला. यापुढे जाण्याचे साहस त्याला करता आले नाही. हे यश देखील थोडे नाही, याची जाणीव असणा-या पोर्तुगालच्या सम्राटाने या ठिकाणाचे केप ऑफगुड होप असे नामकरण केले. दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावरील हे भूशिर आहे. अनेकदा केप ऑफगुड होपचा आफ्रिकेचे सर्वात दक्षिणेकडील टोक असा उल्लेख केला जातो, पण वास्तविकपणे केप अगुलास हे आफ्रिका खंडाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

सुएझचा कालवा तयार होईपर्यंत युरोपातून भारतीय उपखंडाकडे प्रवास करणार्‍या जहाजांना आफ्रिकाखंडाला वळसा घालून जावे लागत असे. केप ऑफगुड होप या भूशिरापर्यंत पोहचणे हा हया प्रवासातील एक मोठा टप्पा मानला जात होता. बार्तुलुम्यू दियास याने केलेला हा प्रयत्न कोलबंससारख्या अनेक साहसी दर्यावदींसाठी खरोखर केप ऑफगुड होप ठरला. बार्तुलुम्यू दियासची सागरी मोहिम भविष्यातील सागरी मोहिमांना प्रेरणादायी ठरली.ज्यामधून अज्ञात अमेरिका खंडाचा अनपेक्षित शोध लागला. युरोपियनां विषयी असेच म्हणावे लागेल की, त्यांनी कॉन्स्टॅंटिनोपल गमावले अन अमेरिकेला पोहचले.

प्रा.डॉ.राहुल हांडे

भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म, इतिहास व साहित्याचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या