राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात काल दि. 10 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने रस्त्याच्या कडेला असलेली अनेक वाहने उडवून नगर-मनमाड राज्य महामार्गावरील एका हॉटेलमध्ये शिरला. या घटनेत प्रचंड नुकसान होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.
काल दि. 10 एप्रिल रोजी दुपारी चार वाजे दरम्यान कोल्हारकडून राहुरीच्या दिशेने चाललेला कंटेनर (एमएच 06 एक्यू 8171) या कंटेनर चालकाचा राहुरी फॅक्टरी परिसरात वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनरने रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक रिक्षा, पाच ते सहा दुचाकी व एका कारला चिरडून कंटेनर बाळासाहेब कदम यांच्या हॉटेल प्रयाग बियर बारमध्ये शिरला. या घटनेत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
घटना घडल्यानंतर नगर-मनमाड राज्य महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. घटना घडून एक तास उलटून गेला तरी पोलीस घटनास्थळी दाखल न झाल्याने उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेत तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे समजते.