अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्य सरकारकडून दिव्यांगांना दिवाळी भेट म्हणून नोकरभरतीमध्ये चार टक्के पदे राखीव ठेवण्याचा आदेश दिव्यांग कल्याण विभागाने दिला आहे. सर्व सरकारी विभागांत कायमस्वरूपीबरोबरच कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करताना दिव्यांगांना हा आदेश लागू होणार आहे. या आदेशाने दिव्यांग इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.
दिव्यांग कल्याण विभागाचे उपसचिव वि. पुं. घोडके यांनी याबाबतचे परिपत्रक काढून सर्व सरकारी विभागांना सूचना दिल्या आहेत. तसेच या पदांची निश्चिती करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करणार आहे. केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा पारित करून दिव्यांग व्यक्तींना समान संधी व अधिकार दिले आहेत. या कायद्यातील तरतुदीनुसार राज्याने दिव्यांगांना सरकारी नोकरीत चार टक्के आरक्षण लागू केले आहे. दिव्यांग कल्याण विभागाकडून सध्या दिव्यांगांच्या दारी अभियानफ राबविण्यात येत आहे.
या अभियानातच सरकारी नोकरीत दिव्यांग आरक्षणाच्या अंमलबजावणी होत नसल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या आहे. त्यावर मुख्य सचिवांनी बैठक घेऊन शासकीय नोकरीत दिव्यांग आरक्षणाच्या अंमलबजावणीवर चर्चा केली. सरकारी नोकरभरतीत दिव्यांगांच्या आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक काढावे, तसेच कंत्राटी पदभरती दिव्यांग व्यक्तींना आरक्षण लागू करण्यासंदर्भात सर्व विभागांनी अभिप्राय द्यावा, अशा सूचना त्यांनी दिव्यांग कल्याण विभागाला दिल्या होत्या. या समितीने निश्चित केलेल्या पदांचा वेळोवेळी आढावा घ्यावा, तसेच कंत्राटी तत्त्वावरील सरकारी पदभरतीतही दिव्यांगांसाठी आरक्षण ठेवावे, अशा सूचना विभागाने दिल्या आहेत.