Friday, November 22, 2024
Homeनगरतिसगावमध्ये वादग्रस्त पोस्ट; मराठा समाजाकडून मोर्चा

तिसगावमध्ये वादग्रस्त पोस्ट; मराठा समाजाकडून मोर्चा

कडकडीत बंद

करंजी |वार्ताहर| Karanji

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एका तरुणाने अक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने शनिवारी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव व तणाव निर्माण झाला. परिसरातील मराठा समाज बांधवांसह इतर काही समाजातील तरुणांनी एकत्रित येत तिसगाव शहर पूर्णपणे बंद ठेवून वृद्धेश्वर चौक ते शेवगाव रोड बस चौकापर्यंत मोर्चा काढून या घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला.

- Advertisement -

शनिवारी तिसगाव बंदचे आव्हान केले होते. सकाळी दहा वाजता वृद्धेश्वर चौकामध्ये मराठा समाजाच्या तरुणांबरोबरच इतर समाजाचे तरुण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले. यावेळी तरुणांनी जय भवानी जय शिवाजी म्हणत जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपहार्य पोस्ट व्हायरल करणार्‍या प्रवृत्तीचा निषेध अशा घोषणा देत हा मोर्चा शेवगाव रोडवरील बसस्थानक चौकापर्यंत नेला. त्याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणार्‍या व्यक्ती विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी शिरापूर येथील एका तरुणाने लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती.

त्यानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता आणि शुक्रवारी वंजारी समाज बांधवांनी पाथर्डी शहर बंदचे आवाहन केले होते. त्याच बरोबर पोस्ट व्हायरल करणार्‍या तरुणाविरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी अशीच एक पोस्ट जरांगे पाटील यांच्या संदर्भात एका तरुणाने व्हायरल केल्याचे लक्षात आल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांनी पाथर्डी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित तरुणा विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी सचिन वायकर, नितीन लोमटे, आसाराम ससे, विठ्ठल मरकड, उद्धव माने, डॉ. बर्डे, लालाभाई शेख यांनी मनोगत व्यक्त करत जरांगे पाटील यांच्या संदर्भात पोस्ट व्हायरल करणार्‍या विरोधात कठोर कारवाई करावी. तसेच कोणत्याच समाजातील व्यक्तीने इतर समाजाच्या संदर्भात अथवा नेत्या विरोधात वादग्रस्त पोस्ट व्हायरल करू नये, असे आवाहन केले. तिसगाव बंद व निषेध मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे उपस्थित सर्वांचे सुनील लवांडे यांनी आभार मानले.

खबरदारी घ्यावी
याप्रकरणी पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. विशेषता तरुणांनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करावा, इतर समाजाच्या अथवा नेत्यांच्या भावना दुखावणार नाहीत, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या