कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
साखर उद्योगात नव्या युगाची सुरुवात झाली असून उसाच्या टाकाऊ पदार्थांपासून सीएनजी निर्मितीची क्रांतिकारी प्रक्रिया आता सुरू झाली आहे. कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा देशातील पहिला कारखाना ठरला आहे, जिथे ऊस प्रक्रियेतील वाया जाणार्या पदार्थांपासून थेट कॉम्प्रेस बायोगॅस (सीएनजी) व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युल निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी व शेतकरी सहकार मेळाव्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून आदर्शवत वाटचाल केली आहे. त्याचाच हा परिपाक मानला जातो आहे. आजच्या काळात पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत सीएनजीवर चालणार्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पर्यावरणपूरक आणि किफायतशीर इंधन म्हणून सीएनजीचा वापर वाढत असताना, कोपरगाव येथील हा अभिनव उपक्रम सहकार क्षेत्रासाठी नवा मैलाचा दगड ठरणार आहे. असा पथदर्शी प्रकल्प उभारणारा हा पहिला कारखाना ठरतो आहे.
दररोज 12 टन सीएनजी निर्मितीची क्षमता असलेला अन्नदाता ते उर्जादाता या संकल्पनेतून संजीवनी उद्योग समूहाने कारखान्यात हा अत्याधुनिक सीएनजी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून दररोज 12 टन सीएनजी निर्मिती होणार असून, तो थेट पेट्रोलियम कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार असून शेतकर्यांच्या हितासाठीही हा उपक्रम वरदान ठरणार आहे. तसेच वाहतूक क्षेत्राला आर्थिक खर्च कमी करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. कारखान्याचे सांडपाणी व डिस्टिलरी स्पेंडमधून मिथेन वायू वेगळा करून शुद्ध स्वरूपातील सीएनजी तयार करण्याची ही प्रक्रिया पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरणारी आहे.
या प्रकल्पाचे ना. अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तर प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्यावतीनेही सर्वांचे स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली.
आज दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता हा ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरणार आहे. यानंतर प्रत्यक्ष सीएनजी निर्मिती व विक्रीला सुरुवात होईल. हा प्रकल्प केवळ कारखान्याच्या उत्पन्नवाढीपुरता मर्यादित नसून ऊर्जा स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि शेतकर्यांच्या प्रगतीचा नवा मार्ग दाखवणारा ठरणार आहे. सर्व कोपरगावकरांच्या कायम स्मरणात राहील असा ऐतिहासिक सुवर्ण क्षण 5 ऑक्टोबर रोजी कायमस्वरूपी कोपरगावच्या विकासाच्या क्रांतीत अग्रस्थानी नोंदवला जाईल, असे कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी सांगितले.




