श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील खामकरवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत आर्थिक घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेच्या चेअरमनने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावावर प्रत्यक्षात असलेल्या शेतजमिनीपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेले खोटे व बनावट 7/12 उतारे आणि इतर कागदपत्रे तयार करून, संस्थेचा सचिव, जिल्हा बँकेचा शाखाधिकारी आणि संचालक मंडळाशी संगनमत करून तब्बल 1 कोटी 12 लाख 52 हजार 500 रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता हा निधी अपहार केला.
ही बाब संस्थेच्या लेखा परीक्षणात उघडकीस आली. उपलेखापरीक्षक महेंद्र तुळशीराम घोडके यांनी 3 फेब्रुवारी रोजी रात्री श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीचा चेअरमन आशिष अंकुश लडकत, अंकुश परसराम लडकत, शोभा अंकुश लडकत, अक्षय अंकुश लडकत, रुपाली अक्षय लडकत, पुजा आशिष लडकत (सर्व रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), हनुमंत रामदास रायकर (रा. हंगेवाडी ता. श्रीगोंदा), अनुसया रखमाजी नगरे (रा. 44 भवानी पेठ, पालखी चौक, पुणे), कुंडलिक किसन नगरे (रा.लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), तुकाराम सीताराम खामकर (रा.लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), महादु भाऊ लडकत, दादा भाऊ लडकत, संचालक अंकुश भगवान खामकर, विठ्ठल मारुती ओहळ रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), संभाजी नामदेव जगताप, दिलीप विष्णु पिसे, संतोष रामचंद्र खोमणे (रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा), पोपट कादरभाई तांबोळी, दत्तु बाबू साळवे (रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), सुरेश बारकु साळवे (रा. साळवे वस्ती, खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), छाया दिलीप गायकवाड (रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा) सोनल मुकिंदा काळे, सदाशिव मारुती ओहळ (रा. खामकरवाडी, लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), मारुती तात्या कोळपे, संस्थेचा तत्कालीन सचिव राजु पोपट अढागळे, जिल्हा सहकारी बँक शाखा मढेवडगांव चा माजी शाखाधिकारी सुदाम भिमाजी कुलाळ (रा. पंतनगर, श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
खामकरवाडी सोसायटीचा तत्कालीन चेअरमन आशिष अंकुश लडकत याने स्वतःच्या व कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर प्रत्यक्षात असलेल्या जमिनीपेक्षा अधिकचे क्षेत्र असलेले खोटे व बनावट 7/12 उतारे इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजामध्ये हस्तक्षेप करून तयार करुन त्यावरुन सचिव राजु पोपट अढागळे यांनी संगणमत करुन संस्थेचे संचालक यांनी कर्ज मंजुरीचा ठराव पास करुन संस्थेला सादर करुन संस्थेची व बँकेची दिशाभूल करत त्यावरुन कर्ज मंजुर करुन घेतले. तसेच जिल्हा बँकेचा मढेवडगाव शाखाधिकारी सुदाम भिमाजी कुलाळ यांनी त्यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची कोणत्याही प्रकारची खात्री न करता कर्ज स्वरुपात 1 कोटी 12 लाख 52 हजार 500 रुपये एवढी रक्कम वितरीत केली आहे. या आरोपींनी संस्थेची व बँकेची फसवणूक, दिशाभूल व विश्वासघात करुन बँकेच्या 1 कोटी 12 लाख 52 हजार 500 रुपये एवढ्या निधीचा नियोजित पध्दतीने संगणमताने अपहार केला – असल्याचे उपलेखापरीक्षक महेंद्र घोडके यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार वाघमारे करीत आहेत.





