करोना लवकर संपणार नाही, त्यासोबत जगायला शिकावे लागेल, असा संदेश जागतिक आरोग्य संघटनेने दोन वर्षांपूर्वी दिला होता. तो काळ करोना महामारीच्या उद्रेकाचा होता. सध्या चीन, अमेरिका, ब्राझील आदी देशांत करोना महासाथीने पुन्हा उचल खाल्ली आहे. चीनमधील परिस्थिती अधिक भयावह असल्याचे वृत्तपत्रांतील बातम्यांवरून लक्षात येते. बाधितांच्या संख्येत वेगाने भर पडत आहे. रुग्णालये रूग्णांनी खच्चून भरली आहेत. नव्या रुग्णांना रिकाम्या खाटा मिळेनाशा झाल्या आहेत. औषधांची टंचाई भासत आहे. करोनामृतांची संख्या वाढतही आहे. रुग्णालयांमध्येच मृतदेह ठेवण्याची वेळ आली आहे. चीनमधील ही आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेचा इशारेवजा सल्ला अतिशयोक्त नव्हता, याची खात्री आता जगातील देशांना पटली असेल. चीनमधील करोनास्फोटाने जगातील देश सावध झाले आहेत. विशेषत: करोनाग्रस्त देशांशी ज्यांचे नित्याचे व्यवहार चालतात, असे देश जास्त सतर्कता बाळगत आहेत. वर्षभरापूर्वी भारताने करोनावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण मिळवल्याचे देशाच्या आरोग्य व्यवस्थेकडून सांगितले गेले. त्यानंतर देशाचे अर्थचक्र आणि जनजीवन पूर्वपदावर येऊन सुरळीत सुरू झाले. सख्खा शेजारी असलेला चीन सीमारेषांचे उल्लंघन करून सतत भारताच्या खोड्या काढत आहे. तो त्रास कमी म्हणून की काय, त्या देशात करोनाउद्रेक झाल्याने भारताला सावधगिरी बाळगणे भाग पडले आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली तातडीने उच्चस्तरीय बैठक घेतली गेली. त्या बैठकीत देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. करोना महामारी अजून संपुष्टात आली नसल्याचे सांगून उपचारांपेक्षा खबरदारी घ्या, घाबरू नका, पण बेसावधही राहू नका, असे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले आहे. पूर्वीप्रमाणे नियमांचे पालन, ‘मुसके’ (मास्क) वापर आणि लसीकरण या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यासही बजावले गेले आहे. संशयित रुग्णांच्या चाचण्या, त्यांच्यावर उपचार आणि देशव्यापी लसीकरणावर भर दिला गेल्यानेच लोकसंख्येत जगात दुसर्या क्रमांकावर असलेल्या भारताला करोनावर मात करणे शक्य झाले. त्या प्रयत्नांत लसीकरणाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. लसीकरणावर भर दिल्याने जनतेत मोठ्या संख्येने प्रतिकारशक्ती निर्माण झाली. त्यामुळेच करोना संसर्ग आटोक्यात येऊ शकला. लसीकरणाची उपयुक्तता लोकांनाही पटली आहे. करोनाच्या भीतीपोटी अनेक लोकांनी पहिली लसमात्रा घेतली. मात्र करोना संपल्याच्या कल्पनेने लोकांनी दुसर्या मात्रेकडे पाठ फिरवली होती. बर्याच जणांनी तर लस घेणेच टाळले होते. तिसर्या लाटेची लक्षणे दिसू लागल्यावर सरकारने 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर मात्रा देण्यास प्राधान्य दिले आहे. दोन मात्रा घेणार्यांपैकी बहुतेकांनी आपल्या शरिरात प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे, तेव्हा बूस्टर मात्रा घेण्याची आता गरज नाही, असे स्वत:च ठरवून टाकले व ती लसमात्रा घेणे टाळले. तथापि चीनमध्ये करोनाने हाहाकार माजवल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये झळकू लागताच लोक करोनाला घाबरून पुन्हा लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांकडे धाव घेत आहेत. तथापि अनेक लसीकरण केंद्रांवर सध्या पुरेशा प्रमाणात लशी उपलब्ध नाहीत. शिल्लक लशी मुदतबाह्य झाल्याने त्यांचा वापर करता येणार नाही. लसीकरणासाठी लोक गर्दी करू लागले, पण लशींचा तुटवडा आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात सध्या तरी हेच चित्र पाहावयास मिळत आहे. ‘कोव्हिशिल्ड’ ही लस घेणार्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, पण सध्या ही लस लसीकरण केेंद्रांवर उपलब्ध नाही. सुमारे तीन आठवड्यांपासून या लशीचा पुरवठाच झालेला नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी म्हटले आहे. लसटंचाई नाशिक जिल्ह्यापुरती मर्यादित असल्याचे समजण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत आणि विविध राज्यांत यापेक्षा फार वेगळी परिस्थिती नसावी.‘तहान लागल्यावर विहीर खणायची’ हा वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. तो केवळ प्रचलित आहे असे नव्हे तर भारतीय लोक त्याचा वापर जीवनात केव्हा तरी करीत असतातच. ‘यथा राजा, तथा प्रजा’ या न्यायाने राज्यकर्त्यांनासुद्धा ही सवय जडली आहे. करोनाचे संकट पुन्हा दाटू लागल्यावर सरकारला आणि नागरिकांना लशींची आठवण झाली आहे. चीनमधील कहर कमी होत नाही तोवर लसीकरणाबाबत सरकार सतर्कता बाळगेल. पुन्हा एखादी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जाईल. लसीकरण केंद्रांपुढे लोक रांगा लावतील. तहान लागण्याआधीच विहिरीची सोय केली तर वेळेवर धावपळ करण्याची गरज उरणार नाही, पण लक्षात कोण घेतो?