मुंबई | Mumbai
सिंगापूर आणि हाँगकाँग इतर देशात कोरोना पुन्हा झपाटयाने वाढत आहे. आता राज्यातही सावधानता बाळगण्याची सूचना जारी झाल्या आहेत. कोरोनाचे २५७ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. मुंबईतही कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. मुंबई महानगरापालिकेच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत ५३ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहे. तसेच कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. तर पुण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना व्हायरसची दहशत पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
काय म्हणाले प्रकाश आबिटकर?
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी घाबरुन जाऊ नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात कोरोना वाढतोय अशा बातम्या मी पाहतोय. परंतु, राज्यात कोरोना वाढला तरी घाबरण्याचे कारण नाही. सगळ्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आहे, त्यामुळे घाबरुन जाऊ नका. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले. सध्या आरोग्य विभागाकडून मॅपिंग सुरु आहे. राज्य शासन सर्व आजारावर काम करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी सक्षम आहे. केईएम रुग्णालयातील ज्या दोन रुग्णांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला, तो कोरोनामुळे झालेला नाही. या दोन्ही रुग्णांना सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) असल्याने त्यांचा मृ्त्यू झाला. सरकार पूर्णपणे अलर्टवर आहे. लोकांनी कुठेही घाबरु नये. केवळ को-मॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांची काळजी घ्यावी लागते, असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व स्थितीवर आम्ही नजर ठेवून असून सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज करण्यात आल्याचे म्हटले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या सोमवारी, आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, आपत्कालीन वैद्यकीय मदत विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमधील तज्ज्ञांसह एक आढावा बैठक झाली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा