Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकरोना : पुण्यात 24 तासांत 7 मृत्यू

करोना : पुण्यात 24 तासांत 7 मृत्यू

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येबरोबरच मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण अधिक गडद होत आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत गेल्या 24 तासांत तब्बल सात करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सात रुग्णांपैकी सहा रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील, तर एक रुग्ण हवेली तालुक्यातील होता. त्यामुळे पुण्यात करोनाबळींची संख्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 92 वर गेली आहे. पुणे शहरात काल रात्रीपासून सात करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. करोनामुळे मृत्युमुखी पडलेले सर्व रुग्ण 65 ते 80 वर्षे वयोगटातील होते. सर्व मृत रुग्णांना आधीपासूनच अन्य व्याधीही होत्या. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 99 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात काल (गुरुवार 30 एप्रिल) दोघा करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचं आज समोर आलं आहे, तर आजच्या दिवसात (शुक्रवार 1 मे) पाच जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये पाच पुरुष, तर दोन महिलांचा समावेश होता. विविध हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण उपचार घेत होते.
पुण्यातील नाना पेठेतील 68 वर्षीय पुरुष रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णाचा काल मृत्यू झाला. भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. तर हवेली तालुक्यातील माळवाडीच्या 80 वर्षीय महिलेला काल दुपारी पावणे बारा वाजता ससून रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले.
ताडीवाल परिसरातील 65 वर्षीय पुरुषाने आज सकाळी सव्वा सात वाजता अखेरचा श्वास घेतला. तर याच भागातील 71 वर्षीय महिलेचा आज साडेबारा वाजता करोनामुळे मृत्यू झाला. या महिलेला करोनासह इतरही व्याधी होत्या.
सिम्बॉयसिस रुग्णालयात सिद्धार्थ नगरीतील 75 वर्षीय पुरुष रुग्णाची प्राणज्योत आज सकाळी साडेपाच वाजता मालवली. तर केईएम रुग्णालयात 51 वर्षीय पुरुषाचा सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला. ते येरवडा परिसरातील रहिवासी होते. तर पर्वती दर्शन परिसरातील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज सकाळी साडेदहा वाजता मृत्यू झाला.

- Advertisement -

पुणे (प्रतिनिधी) – पुणे विभागात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 986 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 1 हजार 519 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 1 हजार 986 बाधित रुग्ण असून 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 783 बाधीत रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 52 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 106 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 31 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 783 झाली आहे. 309 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 1 हजार 375 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत. आजपर्यत विभागात 19 हजार 989 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 19 हजार 96 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 48 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 17 हजार 58 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 986 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या