Wednesday, June 26, 2024
Homeनगरनेवाशात कपाशी बियाणांचा काळाबाजार

नेवाशात कपाशी बियाणांचा काळाबाजार

नेवाशात 109 तर मुकिंदपूर येथे 164 कपाशी बियाणे पाकिटे जप्त, दोघे ताब्यात

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

- Advertisement -

नेवासा शहरात अनधिकृतपणे चढ्या भावाने विक्री करण्याच्याच्या हेतूने कापूस बियाणांची 109 पाकिटे बाळगलेल्या एकास अटक करण्यात आली. या व्यक्तीच्या घरावर छापा टाकून ही बियाणे पाकिटे त्याच्या कारमधून जप्त करण्यात आली. सदर प्रकार 29 मे रोजी रात्री उघडकीस आला. याबाबत पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रताप रामदास कोपनर यांनी फिर्याद दिली असून त्यावरुन महेंद्र कानडे रा. सदाशिवनगर नेवासा याच्या विरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

29 मे रोजी रात्री 10 वाजता जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांनी मिळालेल्या माहितीवरून रात्री 10 वाजता नेवासा खुर्द येथील सदाशिवनगर येथे महेंद्र बबनराव कानडे यांच्या राहत्या घरी गेले. स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने घरात तपासणी करून पाकिटे आहेत का याची खात्री केली. घरासमोरील चार चाकी वाहन मारुती स्विफ्ट (एमएच 14 सीके 8123) मध्ये महेंद्र बबनराव कानडे यांनी ठेवलेली कपाशी बियाणे पाकिटे बाहेर काढली. यामध्ये कपाशी वाण एनबीसी 1111 चे सिलबंद एकूण 48 पाकिटे, कपाशी वाण कबड्डी तुलसी चे एकूण 35 पाकिटे, कपाशी वाण 7067 चे 26 पाकिटे तसेच कांदा पिकाची 1 किलो वजनाचे एक पाकीट असे एकूण 109 कपाशी व एक कांदा पाकीट असा 94 हजार 176 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बियाण्याची विक्री तालुक्यातील शेतकरी यांना जादा दराने करत असल्याचे कानडे यांनी पंचासमक्ष सांगितले. याबाबत महेंद्र बबनराव कानडे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420, बियाणे नियंत्रण आदेश 1983 चे कलम 3, 8, 9, 17, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3(1), 10(1) व 11 तसेच कापूस बियाणे किंमत नियंत्रण आदेश 2009 चे कलम 5, आदी कलमान्वये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.

मुकिंदपूर येथे कारवाई
मुकिंदपूर (नेवासाफाटा) येथील श्री दत्त कृषी सेवा केंद्र येथे काल सायंकाळी कपाशी बियाणांची बेकायदेशीरपणे चढ्या भावाने विक्री करत असताना 164 पाकिटे कृषि अधिकार्‍यांनी जप्त करुन एकास ताब्यात घेतले. 864 रुपयाचे पाकीट असतानाही 1100 रुपये प्रमाणे विक्री केली जात होती. चढ्या भावाने विक्रीसाठी आणलेल्या बेकायदेशीर कपाशी बियाणांसह कृषी दुकानातील गौरव मापारी यास ताब्यात घेण्यात आले. जिल्ह्यातील कृषी अधिकारी नेवासा तालुक्यामध्ये कालपासून तळ ठोकून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या