छत्रपती संभाजीनगर- Chhatrapati Sambhajinagar
दि सॉल्व्ह्न्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA-एसईए) आणि दि ऑल इंडिया कॉटनसीड क्रशर्स असोसिएशन (AICOSCA-एआयसीओएससीए) यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या एसईए-एआयसीओएससीए कॉटनसीड ऑईल कॉन्क्लेव्ह-२०२३ चे छत्रपती संभाजीनगर येथे ७ व ८ जुलै २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. द फर्न रेसिडेन्सी हॉटेलमध्ये आयोजित या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असून यावेळी देशभरातून कापूस बी (सरकी) मूल्यसाखळीशी संबंधित तीनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील.
दि सॉल्व्ह्न्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही देशातील खाद्यतेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील शिखर संस्था आहे. मराठवाडा आणि विदर्भ ही देशातील प्रमुख कापूस उत्पादन केंद्रे असल्याने यंदाची राष्ट्रीय परिषद छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या चालू वर्षात भारतात १२.८ दशलक्ष हेक्टर क्षेत्रामधून ३१५ लाख गाठी कापूस उत्पादन झाले आहे. कापसाच्या वजनात सुमारे ६७% एवढे वजन कापूस बी अर्थात सरकीचे असते. या सरकीपासून देशात १२ लाख टन तेल आणि पेंड निर्मिती होते. त्यातील निम्मे म्हणजे ६ लाख टन तेल प्रामुख्याने गुजरात राज्यात घरगुती सेवन केले जाते. उरलेले तेल हे अन्नप्रक्रिया, हॉटेल आणि कॅंटीन इ. मध्ये वापरले जाते.
कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, काही प्रकारचे कर्करोग, सांधेदुखी सारख्या आजारांवर नियंत्रण करण्याची क्षमता असणारे आरोग्यदायी सरकी तेल हे तळणासाठी जगातील सर्वोत्तम तेलांपैकी एक असून त्यात तळलेले अन्नपदार्थ चार आठवड्यांपर्यंत ताजेपण राखून त्याचे गंध, फ्लेवर इ. गुण अधिक काळ टिकवून ठेवते. मोहरी आणि सोयाबीन नंतर तिसऱ्या क्रमांकावर असणारे सरकी तेल देशाची खाद्यतेल आयात निर्भरता कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावू शकते. या परिषदेच्या निमित्ताने सरकीच्या तेलाच्या अधिक परिचया बरोबरच आणि पशुखाद्य म्हणून सरकी-पेंडीचा वापर करून दुग्ध-उत्पादन वाढ कशी साधता येईल याबाबतच्या चर्चा सत्रात देश-विदेशातील तज्ञ सहभागी होणार आहेत.
या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच देशभरातील सरकी तेल आणि पेंड निर्माते, खाद्यतेल रिफायनरी, पॅकर्स, सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्टर्स, कापूस जिनर्स आणि विक्रेते, ब्रोकर्स आणि सर्वेअर्स, शासकीय अधिकारी, कृषि शास्त्रज्ञ, सल्लागार आणि मशिनरी निर्माते यांचा व्यापक सहभाग राहणार असल्याचे एसईए चे अध्यक्ष अजय झुनझुनवाला आणि एआयसीओएससीएचे चेअरमन संदीप बजोरिया यांनी म्हटले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सरकीच्या मूल्य साखळीतील अनेक पैलुंबाबत माहिती आणि ज्ञान यांची देवाणघेवाण होणार असून अखेरच्या सत्रात सरकी, सरकी तेल आणि सरकीची पेंड यांचे भाव काय राहतील याबाबतची अनुमाने तज्ञमंडळी देणार असल्याने संबंधिताना ही पर्वणीच ठरणार आहे. म्हणून अधिकाधिक संख्येने परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन झुनझुनवाला आणि बजोरिया यांनी केले आहे.
यानिमित्ताने होणाऱ्या सोहळ्यात सरकीच्या मूल्य साखळी अंतर्गत पुरवठा साखळीतील नाविन्यपूर्ण बदल आणि मूल्यवर्धन आणण्यासाठी केलेल्या संशोधनासाठी विद्यार्थी आणि वैज्ञानिक यांना अहमदाबाद-स्थित एन.के.प्रोटीन्सच्या सौजन्याने “नीलेश पटेल इनोव्हेशन पुरस्कार” देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर या विशेष “संगीत रजनी” हा कार्यक्रम सादर करतील.
संघटनेविषयी
दि सॉल्व्ह्न्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) देशातील खाद्यतेल उद्योग, आणि व्यापार विकास व वृद्धी यासाठी स्थापन केलेली, आणि सुमारे सातशेहून अधिक सदस्य असलेली केंद्र सरकार मान्यताप्राप्त संघटना आहे. तेलबिया प्रक्रियाधारक, खाद्यतेल आयातदार आणि रिफायनर्स तसेच तत्सम सेवा पुरवठादार अश्या विविध क्षेत्रातील सदस्य असलेली ही संस्था खाद्यतेल उद्योग, सरकारी संस्था, धोरणकर्ते, आणि अनेक नामांकित जागतिक संघटना यांचा समन्वय साधून खाद्यतेल उद्योगाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी देशविदेशात सतत कार्यरत असते. जिनिव्हा-स्थित इंटरनॅशनल ट्रेड सेंटर ने एसईए ही सर्वोत्तम आणि यशस्वी उद्योग प्रतिनिधि संस्था असल्याचे म्हणून आपल्या अहवालात त्याचा उल्लेख केला आहे.