दिल्ली | Delhi
आशिया कप २०२३ मध्ये भारतानं सुपर फोरमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यांत पावसानं व्यत्यय आणला. पैकी पहिला सामना पावसामुळे वाया गेला. तर दुसरा सामना राखीव दिवसामुळे निकाली निघाला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा तब्बल २२८ धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत भारतानं पाकिस्तानचा सर्वात मोठा पराभव केला. यामुळे सुपर फोरच्या गुणतालिकेतील रंगत वाढली आहे. पण यासोबतच चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येणार आहे.
क्रिकेट चाहत्यांना आता या आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामनाही पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये हा सामना होऊ शकतो. हा विजेतेपदाचा सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबोमध्येच खेळवला जाईल. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघाला सुपर-४ फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. या फेरीतील संघाचा दुसरा सामना आज (१२ सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. यानंतर तिसरा सामना बांगलादेशविरुद्ध (१५ सप्टेंबर) होईल. तर पाकिस्तानचा सुपर-४ मधील शेवटचा सामना १४ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आहे.
भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचण्यासाठीचं समीकरण
-
भारतानं आज श्रीलंकेचा पराभव केल्यास त्यांचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित. त्यानंतर भारताचा बांग्लादेशविरुद्ध सामना होईल. पण तो केवळ औपचारिकता असेल.
-
पाकिस्तानचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध १४ सप्टेंबरला होईल. अंतिम फेरी गाठायची असेल तर पाकिस्तानसाठी करो या मरोची स्थिती. सामना जिंकावाच लागेल. जिंकल्यास भारताविरुद्ध अंतिम फेरीचा सामना.
-
पाकिस्तान वि. श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाल्यास, अपूर्ण राहिल्यास दोन्ही संघांचे प्रत्येकी ३ गुण होतील. मग नेट रनरेट पाहिला जाईल. त्या परिस्थितीत श्रीलंका अंतिम फेरीसाठी पात्र. कारण त्यांचा नेट रनरेट उत्तम.
-
आजच्या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा पराभव केल्यास भारताला बांग्लादेशला नमवून अंतिम फेरी गाठावी लागेल. पण पाकिस्तानला अंतिम फेरी गाठायची असल्यास श्रीलंकेला मोठ्या फरकानं पराभूत करावं लागेल.
सुपर-४ ची गुण तालिका
भारत – १ सामना – २ गुण, ४.५६० नेट रनरेट
श्रीलंका – १ सामना – २ गुण,०.४२० नेट रनरेट
पाकिस्तान – २ सामने – २ गुण, -१.८९२ नेट रनरेट
बांगलादेश – २ सामने – ० गुण, -०.७४९ नेट रनरेट
आशिया चषकासाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, ईशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ
अब्दुल्ला शफीक, फखर जमां, इमाम-उल-हक, बाबर आजम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, सऊद शकील, मोहम्मद रिजवान, मोहम्मद हारिस, शादाब खान (उपकर्णधार) , मोहम्मद नवाज, उस्मा मीर, फहीम अशरफ, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह और शाहीन शाह आफरीदी.