नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एमडी अर्थात मेफेड्रोनच्या (MD) पाठोपाठ नाशकात (Nashik) गांजाची (Ganja) चोरीछुपी विक्री सुरु असल्याचे उघड झाले आहे. शहर पोलिसांच्या (City Police) युनिट एकने वडाळागावातील एका घरावर छापा (Raid) टाकून २८ किलो ओलसर गांजा हस्तगत केला आहे. तर हा गांज्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर मार्गे नाशकात सप्लाय केल्याचे समोर आले असून त्याची वडाळागावातून नाशकात चोरी छुप्या पद्धतीने विक्री केली जात होती हे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शाहरुख शहा रफिक शहा (वय २९, रा. ए-८, म्हाडा वसाहत बिल्डिंग, वडाळागाव, मूळ रा. मेहबूबनगर, नाशिक) असे गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. युनिट एकचे अंमलदार मुख्तार शेख यांना शहा याच्या घरात गांजाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या सूचनेने युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या निर्देशानुसार युनिट एकच्या पथकाने(दि. २८) रोजी सायंकाळी पाच वाजता शहा याच्या घरात छापा टाकून झडती घेतली.
त्यावेळी पथकाच्या हाती सव्वाचार लाख रुपयांचा ओलसर गांजा हाती लागला. या गांजासह एक मोबाईल असा ४ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शहा याला ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास उपनिरीक्षक बी. डी. सोनार करत आहेत.
महिलाही रडारवर
वडाळागावात (Wadalagaon) यापूर्वीही गांजा तस्करी व विक्रीचे गुन्हे घडले आहेत. त्याबाबत गुन्हे दाखल असून वडाळागावातून शहराच्या विविध भागांसह उपनगरांत गांजाची बेकायदेशिर विक्री सुरु आहे. शंभर रुपयांत ४० ग्रॅमची गांज्याची पुडी चोरुन विक्री होत असल्याचेही तपासात निष्पन्न होत आहे. याच भागातील संशयित महिला छोटी भाभी, तिचा पती एमडी ड्रग्जसह गांजा विक्री करत असल्याचे तीन महिन्यांपूर्वी समोर आले होते. तर, आता छोटी खाला नावाची संशयित महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.
शिरपूरला तपास!
शहा याने शिरपूर येथून गांजा आणल्याची माहिती पोलिसांना आहे. त्यानुसार इंदिरानगर पोलीस तपासासाठी शिरपूरला जाण्याची शक्यता आहे. शहा याने गेल्या १५-२० दिवसांपासून शिरपूरहून कमी अधिक स्वरुपात गांजा आणूण वडाळागावात त्याचा साठा केल्याचे आढळले आहे. त्यातून त्याने आतापर्यंत किती गांजा आणला, कुणाच्या मार्फतीने विक्री केली, याचा तपास सुरु आहे.