अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar
काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर धाड टाकून मोठा अड्डा उद्ध्वस्त केला होता. या कारवाईत पकडलेल्या आरोपींकडून झालेल्या चौकशीत आता अहिल्यानगरचे कनेक्शन समोर आले आहे. अहिल्यानगर शहर व परिसरात काही ठिकाणी अशाच प्रकारचे कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती हाती लागली असून या प्रकरणात जिल्ह्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचे नावही चर्चेत आले आहे. दरम्यान, हे कॉल सेंटर नाशिकसह ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई आणि अहिल्यानगर येथे सुरू असताना त्यामागे काही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचे अर्थपूर्ण पाठबळ असल्याची धक्कादायक माहिती सीबीआयच्या चौकशीत समोर आली आहे. या अधिकार्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचाही संपर्क कॉल सेंटर चालकांशी असल्याचे पुरावे मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी सीबीआयकडून संबंधित अधिकार्यांची चौकशी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
बनावट कॉल सेंटरव्दारे परदेशातील लोकांना विविध आमिषे दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गंडा घालण्यात आला होता. नाशिकसह इतर ठिकाणांहून यूएसए, कॅनडा, ब्रिटन आदी देशांतील नागरिकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्या देशांच्या सायबर यंत्रणांनी डिजिटल ट्रॅकिंगच्या माध्यमातून आयपी अॅड्रेस शोधून भारत सरकारला अहवाल पाठवल्यानंतर सीबीआयने ठिकठिकाणी छापेमारी मोहीम सुरू केली. इगतपुरी येथील छाप्यात मुंबईतील पाच जणांना अटक झाली होती. त्यापैकी दोन जण मीरा-भाईंदर येथील असून, त्यांनी रायगड आणि पालघर जिल्ह्यांतही अशाच पध्दतीने कॉल सेंटर चालविल्याची कबुली दिली.
त्यानंतर अहिल्यानगर कनेक्शन समोर आले असून सीबीआय त्यादृष्टीने तपास करत आहे. दरम्यान हा व्यवसाय अहिल्यानगर जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आला होता. इगतपुरीतील छाप्यानंतर अहिल्यानगर शहर व परिसरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या सेंटरचा गाशा गुंडाळण्यात आला, मात्र तपासातून कॉल सेंटरचे अहिल्यानगर कनेक्शन समोर आले आहे. या बनावट कॉल सेंटर प्रकरणात पोलिसांचे पाठबळ नसते तर अशी केंद्रे सुरू करणे अशक्य होते, असे सूत्रांचे मत आहे. पालघर, रायगडनंतर नाशिक व अहिल्यानगरमध्ये सुरू झालेल्या या सेंटरना काही वरिष्ठ अधिकार्यांचा ‘आशीर्वाद’ होता, अशी चर्चा सीबीआयच्या चौकशीत पुढे आली आहे.
कॉल सेंटर चालक व पोलीस अधिकार्यांच्या संपर्कातील पुरावेही सीबीआयला मिळाले आहेत. त्यावरून अर्थसंपर्क व लाभाचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहर, भिंगार उपनगर, एमआयडीसी तसेच नगर तालुक्यात हे कॉल सेंटर कार्यरत होते. चौकशीत या ठिकाणांची नोंद झाली असून, जिल्ह्यात इतर ठिकाणीही अशी केंद्रे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही स्थानिक पोलीस अधिकार्यांनी याला विरोध दर्शविला होता, परंतु वरिष्ठ अधिकार्यांच्या ‘हितसंबंधां’मुळे त्यांचा आवाज दाबला गेला आणि नंतर ते देखील याचे ‘लाभार्थी’ झाले असल्याची चर्चा सुरू आहे.
अहिल्यानगरचा या बनावट कॉल सेंटर जाळ्याशी असलेला संबंध स्पष्ट होत असून, सीबीआयच्या चौकशीत अनेक उच्चपदस्थांचे नाव समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातून ‘सत्तेच्या छत्रछायेखाली फसवणुकीचा उद्योग’ कसा फोफावला हे समोर येण्याची चिन्हे आहेत.
पोलीस दलात ‘खमंग चर्चा’
या घडामोडींची सध्या अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात खमंग चर्चा सुरू आहे. ‘भाई, दाल में कुछ काला है’ असे बोलले जात असून, अधिकारी- कर्मचार्यांमध्ये कॉल सेंटरमधील सहभाग, कमाईचे आकडे आणि लाभार्थी कोण याबाबत कुजबुज सुरू आहे. तपासाची दिशा पाहता, आगामी काळात काही वरिष्ठ अधिकार्यांचे बिंग फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ यामध्ये गुंतले असल्यामुळे पोलीस दलात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. कॉल सेंटर कुठे सुरू होते, कॉल सेंटर चालकांच्या संपर्कात कोण कोण होते, आता सीबीआय काय कारवाई करणार, कोणाची विकेट पडणार अशा वेगवेगळ्या चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
महासंचालकांकडून कारवाईचे संकेत
गेल्या शुक्रवारी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली. राज्यभरातील अवैध धंद्यांमध्ये पोलिसांचा सहभाग आढळून येत असल्याने त्यांनी नाराज व्यक्त केली. बनावट कॉल सेंटरशी अधिकार्यांचे नावे जोडली जात असल्याचे सांगताना यामध्ये कोणाचा सहभाग असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बनावट कॉल सेंटरचा प्रकार गंभीर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सीबीआयकडून अहवाल आल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.




