अहिल्यानगर | सचिन दसपुते
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा वर्चस्ववाद आता पोलिसांसमोर मोठे आव्हान बनला आहे. ‘क्राईम डायरी’तून टोळ्यांच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीची बाब उचलून धरल्यानंतर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने हालचाल करत, दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारांची माहिती गोळा करून, त्यांच्या टोळ्यांशी असलेल्या संबंधांची सखोल चौकशी करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले आहेत. याअनुषंगाने शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प या तिन्ही पोलीस ठाण्यांतून माहिती संकलित करण्यात आली. यामध्ये दोन व अधिक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या एकूण 251 सराईत गुन्हेगारांची माहिती समोर आली आहे. त्यातून 40 गुन्हेगारी टोळ्यांची जंत्री तयार करण्यात आली असून, त्यातील 17 टोळ्या सध्या सक्रिय असल्याचे उघड झाले आहे.
अहिल्यानगर शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि त्यासोबतच गुन्हेगारीच्या घटनांत झालेली वाढ प्रशासनासमोरील गंभीर बाब बनली आहे. सावेडी, एमआयडीसी, केडगाव व भिंगार उपनगरांत खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, दहशतीसाठी शस्त्र प्रदर्शन, चोरी, घरफोड्या, सोनसाखळी चोरीसारख्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांची एकमेकांशी वाढती संपर्क साखळी आणि त्यातून उद्भवणारे टोळीगट तयार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे.
सध्या शहरात 17 गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असून त्यांनी अलिकडच्या काळात खून, गंभीर हाणामारी, खंडणी, दहशत निर्माण करणे यांसारखे गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर हद्दपार, मकोका सारखी कठोर कारवाई करता येईल का, याचा विचार पोलिसांनी सुरू केला आहे. त्यासाठीचे प्रस्ताव तयार करून संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सदरचे प्रस्ताव पोलीस उपअधीक्षक भारती यांच्या मार्फत अधीक्षक घार्गे यांच्या कडे पाठविणार आहे. जास्तीत जास्त टोळ्या, गुन्हेगार अहिल्यानगर शहरातून हद्दपार करण्यावर अधीक्षक घार्गे यांचा भर असणार आहे.
गुन्हेगारी टोळ्या : 40
सक्रिय टोळ्या : 17
तोफखाना : 119 गुन्हेगार
कोतवाली : 84 गुन्हेगार
भिंगार कॅम्प : 48 गुन्हेगार
पोलिसांची खमकी भूमिका
शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व भिंगार कॅम्पचे सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी आपापल्या हद्दीतील गुन्हेगारांवर वचक ठेवला आहे. कोणतीही घटना घडताच हे अधिकारी स्वतः घटनास्थळी पोहोचतात, तपास सुरू करतात व कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवतात.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, स्थानिक दादागिरी करणारे लोक प्रभागात सक्रीय होण्याची शक्यता लक्षात घेता, ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची मंडळी निवडणूक काळात गोंधळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा टोळ्यांवर वेळीच प्रतिबंधक कारवाई केल्यास निवडणूक शांततेत पार पडण्यास मदत होणार आहे.
अहिल्यानगर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी आता धडक कारवाईची तयारी केली आहे. या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, त्यांच्या विरोधात हद्दपार, मकोका यांसारखी कठोर कायदेशीर पावले उचलली जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही पावले वेळेवर उचलल्यास शहरातील शांतता अबाधित राहण्यास निश्चितच मदत होईल, असे शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.




