Monday, February 9, 2026
HomeनगरAhilyanagar : अधिकारी-कर्मचार्‍यांचाच भाविकांच्या श्रद्धेवर घाला

Ahilyanagar : अधिकारी-कर्मचार्‍यांचाच भाविकांच्या श्रद्धेवर घाला

शनिशिंगणापूर देवस्थान ऑनलाईन पूजा अ‍ॅप प्रकरणातील अपहाराचा डाव उघडकीस

अहिल्यानगर | सचिन दसपुते| Ahilyanagar

शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन व पूजा अ‍ॅपमधील अपहार प्रकरणाचा तपास पूर्ण करून येथील सायबर पोलिसांनी नेवासा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. देवस्थानच्या अधिकृत परवानगी असलेल्या अ‍ॅपमधूनच अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात सुमारे 77 लाख 46 हजार 341 रूपयांचा अपहार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले असून नऊ संशयित आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अ‍ॅप अपहारप्रकरणाचा तपास पोलिसांनी हाती घेतल्यानंतर देवस्थानच्या तत्कालीन अधिकारी-कर्मचार्‍यांनी अ‍ॅपधारकांना दिलेले परवानगी पत्र नव्याने तयार करून कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर आलेल्या रक्कमेबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

तसेच केवळ तोंडी आदेशानुसार कर्मचारी संजय पवार हा अ‍ॅपचे कामकाज पाहत असल्याचे, त्याने एका अ‍ॅपच्या डायरेक्टरला धमकावून बनावट परवानगी पत्र व हिशोब पोलिसांकडे सादर करण्यास भाग पाडल्याचे आणि स्वतःच्या सहीने पूजा बुकिंगच्या परवानग्या दिल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण प्रकरणातून देवस्थानच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनीच अपहाराचा डाव रचल्याचे स्पष्ट झाले असून भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

YouTube video player

देवस्थानची परवानगी न घेता काही अ‍ॅपधारकांनी पुजा व व्हिआयपी दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या होत्या. याबाबत आमदार विठ्ठलराव लंघे व आमदार सुरेश धस यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले. हा अपहार तब्बल 500 कोटींचा असल्याचा दावा केला गेला. याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अहिल्यानगर सायबर पोलिसांनी चौकशी करून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, देवस्थानने परवानगी न दिलेल्या अ‍ॅपमधून फारशा पूजा झालेल्याच नव्हत्या. मात्र देवस्थानने देवधाम, श्रीमंदीर, उत्सव, वामा आणि शेमारू या पाच अ‍ॅप्सला ऑनलाईन पूजा, तेल चढावा व लाईव्ह दर्शनासाठी अधिकृत परवानगी दिली होती.

देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या परवानग्या देण्याचे अधिकार तत्कालीन कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले व उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे (मयत) यांना देण्यात आले होते. शेमारू कंपनीसोबत देवस्थानचा करार होता, सन 2018 पासून दरवर्षी ठराविक रक्कम देणगी स्वरूपात देवस्थानला देण्याच्या बदल्यात लाईव्ह दर्शनाची परवानगी देण्यात आली होती. देवधाम अ‍ॅपला ऑनलाईन पूजा व बुकिंगची परवानगी प्रथम कार्यकारी अधिकारी दरंदले आणि नंतर उपकार्यकारी अधिकारी शेटे यांच्या सहीने देण्यात आली होती. मात्र शेटे यांच्या तोंडी आदेशानुसार कर्मचारी संजय पवार हा अ‍ॅपचे कामकाज पाहू लागला. पवार याने अ‍ॅप मालकांवर दबाव टाकून देवस्थानच्या बँक खात्यात जमा होणारी रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर स्वीकारली.

पोलिसांच्या चौकशीत अ‍ॅपमालकांनी पवार यानेच तोंडी रक्कम ठरवून पैसे स्वतःच्या खात्यावर घेतल्याचे स्पष्ट केले. ऑनलाईन अ‍ॅपविरोधात तक्रारी सुरू झाल्यानंतर शेटे, पवार व दरंदले यांनी परवानगी पत्र नव्याने तयार करून त्या रकमेबाबत कायदेशीर असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले. उत्सव अ‍ॅपच्या डायरेक्टरने दिलेल्या माहितीनुसार पवार याने त्यांना धमकावून बनावट परवानगी पत्र व हिशोब पोलिसांकडे सादर करण्यास भाग पाडले. चौकशीत असेही समोर आले की, पवार याने स्वतःच्या मागणी पत्रावर हस्ताक्षर करून शनिजयंतीसाठी पूजा बुकिंगची परवानगी दिली होती. कोणताही अधिकार नसताना त्याने शेटे यांच्या तोंडी आदेशावर स्वतःच्या सहीने परवानग्या दिल्या.

वामा अ‍ॅपचे कामकाजही शेटे यांच्या सांगण्यावरून पवार याने पाहिले असून पुजारी व कॅमेरामन यांच्या नावाखाली स्वतःसाठी पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले. श्रीमंदीर अ‍ॅपला 13 महिन्यांसाठी परवानगी देण्यात आली होती, मात्र त्या अ‍ॅपमधून पुजारी व कॅमेरामन यांच्या खात्यात आलेली रक्कम पुढे सचिन शेटे याच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. चौकशीत सचिन शेटे याने काही रक्कम पूजा साहित्याकरिता खर्च केली असून उर्वरित रक्कम स्वतःसाठी वापरल्याचे मान्य केले आहे. या संपूर्ण प्रकरणातून देवस्थानच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनीच अपहार केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्मचार्‍यांच्या खात्यावर 77 लाख
देवधाम, उत्सव, वामा व घरमंदीर अ‍ॅपमधून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी संजय पवार याने स्वतःच्या तीन व वडिलांच्या एका बँक खात्याचा वापर केला. तर सचिन शेटे याने श्रीमंदीर अ‍ॅपमधील रक्कम स्वतःच्या खात्यावर घेतली. दोघांनी मिळून एकूण 77 लाख 46 हजार 341 रूपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले असून त्यापैकी संजय पवार याने 41 लाख 90 हजार 388 रूपये तर सचिन शेटे याने 35 लाख 55 हजार 953 रूपयांचा अपहार केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. देवस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी, पुजारी, अ‍ॅप मालक यांच्या सुमारे 100 बँक खात्यांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर हा अपहार उघडकीस आणला आहे.

घरात बसून केल्या पूजा
पुजापरिसेवा अ‍ॅप प्रकरणात वरूण पाठक (रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा) या पुजार्‍याने विनापरवानगी पाच पूजा घरात बसून केल्याचे आढळून आल्याने त्याच्यासह अ‍ॅप मालक उज्ज्वल भट्ट्याचार्य याला संशयित आरोपी करण्यात आले आहे. तसेच हरिओम अ‍ॅपचे विभू जयप्रकाश अग्रवाल व शालिनी जयस्वाल यांनी देवस्थानची परवानगी न घेता कर्मचारी सचिन बानकर याला संपर्क केला. त्याच्या ओळखीचा फायदा घेत बेकायदेशीर दर्शन घडवून आणले. विशेष म्हणजे देवस्थानच्या चौथर्‍यावर जाण्यासाठी लागणारी कोणतीही पावती न फाडता, परवानगी न घेता हरिओम अ‍ॅप मालकांनी बानकर याच्या ओळखीतून बेकायदेशीर दर्शन घडून आणले आहे. अग्रवाल, जयस्वाल यांच्यासह बानकरला या गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Belapur : पश्चिमेचे पाणी वळवून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारणार

0
बेलापूर |वार्ताहर| Belapur गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असून, समुद्राला वाया जाणारे 55 टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात आणण्यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्चाची योजना नियोजित...