अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कामाची थकीत मजुरी मागितल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्याच सहकार्याच्या डोक्यात कडप्पा फरशीचा तुकडा घालून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी शहरालगतच्या इंदिरानगर परिसरात घडली.
या हल्ल्यात रवी रमेश निकाळजे (रा. इंदिरानगर, आरणगाव रोड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी, हल्लेखोर समीर शेख (रा. इंदिरानगर) याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी रवी निकाळजे आणि संशयित आरोपी समीर शेख हे दोघेही सेंट्रींग आणि वेल्डिंगची कामे करतात व एकमेकांच्या परिचयाचे आहेत. रवी यांनी समीरसोबत केलेल्या कामाचे काही पैसे थकलेले होते. शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आरणगाव रोडवरील सूरज हॉटेलसमोर रवी यांनी समीरकडे आपल्या थकीत पैशांची मागणी केली. यावेळी समीरने पैसे देण्यास नकार देत रवी यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला जाऊन समीरने त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
इतक्यावरच न थांबता, आज तुला जिवेच ठार मारून टाकतो,अशी धमकी देत त्याने जवळच पडलेला कडप्पा फरशीचा तुकडा उचलला आणि रवी यांच्या डोक्यात जोरात मारला. या हल्ल्यात रवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव सुरू झाला आणि ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत.




