मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
दादर (Dadar) येथील स्विमिंग पूलमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर (Minor Girls) लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३० वर्षीय नराधमाला विशेष सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. आरोपीने लैंगिक हेतूने वारंवार मुलींचा पाठलाग केला असल्याचे आरोपीच्या कृतीवरून दिसून येते, असे निरीक्षण विशेष सत्र न्यायाधीश बी.आर. गारे यांनी नोंदवले आणि हा निकाल देत नराधमाला शिक्षेचा दणका दिला.
६ मार्च २०२० रोजी १३ आणि १२ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची (Rape) घटना घडली होती. याप्रकरणी विशेष न्यायाधीश बी.आर. गारे यांनी आरोपीला दोषी ठरवले. दादर परिसरातील स्विमिंग पूलमध्ये १३ वर्षांच्या मुलीला पोहताना तिच्या पोहण्याच्या पोशाखात पुरूषाचा हात तिच्या गुप्तांगावर दाबल्याचे जाणवले. तिने ताबडतोब हा प्रकार महिला प्रशिक्षक आणि जीवरक्षकाला सांगितला. त्यांनी पीडित मुलीने ओळख पटवलेल्या व्यक्तीला फोन काॅल केला. जेव्हा त्या मुलीचे पालक आले, तेव्हा १२ वर्षांच्या दुसऱ्या मुलीनेही त्याच पुरूषाकडे बोट दाखवले आणि अशाच प्रकारे आपलाही लैंगिक छळ झाल्याचे मुलीने निदर्शनास आणले.
दरम्यान, आरोपीने (Accused) मुलीच्या गुप्तांगांना दाबून स्पर्श केल्याचे पीडित मुलीच्या सांगण्यावरून स्पष्ट झाले. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात खटला चालला आणि पाच वर्षानंतर आरोपीला दोषी ठरवून न्यायालयाने त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाने दोन्ही अल्पवयीन मुलांसह आठ साक्षीदारांची तपासणी केली आणि आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.




