नाशिक | Nashik
भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या अशोक खरातला (Ashok Kharat) आज (बुधवारी) पोलीस कोठडी संपल्याने नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात (Nashik District Sessions Court) हजर करण्यात आले. यावेळी त्याला न्यायालयाने पहिल्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर दुसऱ्या गुन्ह्यात अटक दाखवून त्याला पुन्हा उद्या (गुरुवारी) नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.
कल्पना खरातवर गुन्हा दाखल
भोंदू अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यासह एकूण ५ जणांवरशिर्डीतील ४ एकर भूखंड खरेदीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा करण्यात आला आहे. यात खरात पती-पत्नीसह शिर्डीतील मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांचा समावेश आहे. दरम्यान, शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर खरातची पत्नी फरार झाली असून, तिच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Wife Kalpana Kharat : वयात मोठं अंतर, लग्नानंतर सुनीताची झाली ‘कल्पना; भोंदू अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू ऐकून व्हाल चकित
खरातचा मुलगा आणि मुलीला तपासासाठी घेतले ताब्यात
अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याने काल (मंगळवारी) रात्री एसआयटीने खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी तृप्ताबाला यांना तपासासाठी ताब्यात घेतले. त्यामुळे आता त्याच्यासमोर मुलांची चौकशी होणार आहे. तर फरार असलेल्या कल्पनाच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खरातविरोधात केस लढण्यास सरकारी वकील मिसरांचा नकार
अशोक खरातविरोधातील आजच्या सुनावणीआधी सरकारी वकील अजय मिसर (Ajay Misar) यांनी खरातविरोधात एसआयटीची केस लढण्यास असमर्थता दाखवली. एसआयटीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस लढविण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र, त्यांनी केस लढवण्यास नकार दिला आहे. २०११ च्या मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला,रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसेच अन्य महत्त्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्याने मिसर यांनी केस लढण्यास नकार दिल्याचे बोलले जाते.





