Wednesday, July 3, 2024
Homeनगरबसला दारूच्या नशेत धडक; चालक-वाहकाला मारहाण

बसला दारूच्या नशेत धडक; चालक-वाहकाला मारहाण

दगडफेकीत बसचे नुकसान || भिंगारमधील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

दारूच्या नशेत वाहन चालवून एसटी बसला धडक दिली. बसच्या चालक व वाहकाला मारहाण करून तिकीट मशीन व मोबाईलची तोडफोड केली. बसवर दगडफेक करून नुकसान केल्याची घटना भिंगार शहरात नगर – पाथर्डी रस्त्यावर घडली. मारहाणीत दादासाहेब लक्ष्मण जाधव (रा. रोहिला गड,ता. अंबड, जि. जालना) गोविंद दादाहरी घुले (रा. एकनाथनगर, ता. अंबड, जि. जालना) जखमी झाले आहेत. जखमी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल प्रकाश गुंड (वय 32, रा. प्रकाश हॉटेलच्या मागे, सागर अपार्टमेंट, भिंगार) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मारहाण, सरकारी कामात अडथळा आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (दि. 20) रात्री जाधव हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस (एमएच 14 बीटी 2289) घेऊन नगर – पाथर्डी रस्त्याने जात असताना साडेआठच्या सुमारास भिंगारमधील हॉटेल मंथनसमोर अमोलने त्याच्या ताब्यातील वाहन (एमएच 42 के 1338) दारूच्या नशेत चालवून भरधाव वेगात एसटी बसला धडक दिली. दरम्यान अपघातानंतर अमोलने दादासाहेब व त्यांचे साथीदार गोविंद घुले यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. गोविंदकडील तिकीट मशीन व मोबाईल आदळून तोडून नुकसान केले. एसटी बसवर दगडफेक करून समोरील काच फोडली.

झटापटीत गोविंद घुले यांच्या खिशातील 18 हजार 235 रुपये कोठेतरी पडून गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अमोलला ताब्यात घेतले. दादासाहेब यांच्या फिर्यादीवरून अमोल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोरसे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या