Wednesday, July 3, 2024
Homeनगरफुकट आंबे दिले नाही म्हणून राहुरी विद्यापीठ येथे विक्रेत्यास मारहाण

फुकट आंबे दिले नाही म्हणून राहुरी विद्यापीठ येथे विक्रेत्यास मारहाण

चार जणांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

फुकट आंबे देण्यास नकार दिल्याने चार ते पाच जणांनी मिळून फळ विक्रेत्याला लाकडी दांडा, लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच विक्रेत्याच्या खिशातील रोख रक्कम व गळ्यातील सोन्याचा बदाम काढून घेण्यात आल्याची घटना राहुरी तालुक्यातील विद्यापीठ येथे 6 जून रोजी घडली. पुंडलिक नारायण मासरे (वय 41 वर्षे), रा. कोळीवाडा, राहुरी ता. राहुरी, हे फळ विक्रेते असून त्यांचे राहुरी तालुक्यातील राहुरी विद्यापीठ येथे फळाचे दुकान आहे. दि. 6 जून 2024 रोजी रात्री आठ वाजे दरम्यान पुंडलिक मासरे हे त्यांच्या दुकानावर असताना आरोपी तेथे आले. आणि म्हणाले, तुम्ही बाहेर गावचे आहेत, तुम्ही येथे आंबे कसे विकता, तुम्हाला येथे आंबे विकायचे असेल तर आम्हाला फुकट आंबे द्यावे लागतील.

तेव्हा पुंडलिक मासरे त्यांना म्हणाले, आम्हीच आंबे विकत घेतलेले आहेत, तुम्हाला फुकट कसे देणार. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी पुंडलिक मासरे यांना लाकडी दांडा, लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच दुकानचे नुकसान केले व तु जर आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी पुंडलिक मासरे यांच्या खिशातील 70 हजार रुपये व त्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याचा बदाम काढून घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत पुंडलिक नारायण मासरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल बापु मोरे, अनिल संजय घोरपडे, बाला दत्तु साबळे, रा. डिग्रस, ता. राहुरी व त्यांचा एक अनोळखी साथीदार अशा चार जणांवर गु.र.नं. 680/2024 भादंवि कलम 324, 327, 427, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर राहुरी पोलीस पथकाने या घटनेतील आरोपी राहुल मोरे व अनिल घोरपडे या दोघांना ताबडतोब ताब्यात घेऊन जेरबंद केले. तर इतर आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या