Sunday, November 17, 2024
Homeनगरबलात्कार्‍याला 20 वर्षे सक्तमजुरी

बलात्कार्‍याला 20 वर्षे सक्तमजुरी

जिल्हा न्यायालयात अवघ्या सहा दिवसांत सुनावणीचे कामकाज पूर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आनेकर यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपीला पोक्सो कलमान्वये दोषी ठरवून 20 वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. घटना घडल्यापासून दोन महिने व सात दिवसांमध्ये निकाल लागला असून प्रत्यक्ष सहा दिवस सुनावणीचे कामकाज न्यायालयासमोर चालले. मनोज हरिहर शुक्ला (वय- 35 रा. भरसाळ, जि. गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

काठमांडू (नेपाळ) येथील रहिवासी असलेले एक कुटुंब रोजगारासाठी पारनेरमध्ये आले आहे. पारनेरमध्ये एका शेतकर्‍याच्या मळ्यात हे कुटुंब वास्तव्यास आहे. 11 मे 2017 ला रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित मुलीची आई घरात काम करत असताना पीडिता बाहेर बसलेली होती. त्यावेळी शेजारी चाळीत राहणारा आरोपी शुक्ला याने पीडितेला चॉकलेटचे अमिष दाखवून खोलीत नेले व तेथे पीडितेवर अत्याचार केला. आईने घराबाहेर मुलगी दिसली नाही म्हणून शोधाशोध केली. मुलगी आरोपीच्या घरात मिळून आली. आरोपीने केलेल्या कृत्याबाबत पीडितेने आईला सांगितले.

पीडितेच्या आईने 12 मे 2017 ला पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. डी. पवार यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल. आनेकर यांच्या समोर पूर्ण झाली.

सरकारी पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात मुलीची साक्ष व न्यायवैद्यकिय अहवाल या बाबी महत्वपुर्ण ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीस दोषी ठरवत 20 वर्षे सक्तमजुरी, एक लाख रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम पिडीत मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनिल सरोदे यांनी काम पाहिले. त्यांना सहायक फौजदार लक्ष्मण काशिद यांनी मदत केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या