अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील कल्याण रस्त्यावर किरकोळ वादातून दोघा मित्रांवर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. गणेश किरण बोरूडे (वय 23, रा. बोरूडे मळा, बालिकाश्रम रस्ता) व इंद्रजित राहिंज (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) हे दोघे जखमी झाले आहेत.
जखमी गणेश बोरूडे यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी राजेंद्र जाधव, प्रथमेश पठारे, समीर सय्यद व प्रणव दाणे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बोरूडे आणि त्यांचा मित्र इंद्रजित राहिंज हे दुचाकीवरून जात असताना घोडा टांगा पुढे घेण्याच्या कारणावरून सनी जाधव याच्याशी त्यांचा वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून, गणेश व्दारका लॉन्स परिसरात आले असता सनी जाधव, प्रथमेश पठारे, समीर सय्यद आणि प्रणव दाणे यांनी त्यांना गाठले. तू खूप माजला आहेस का, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली.
हल्ल्यादरम्यान गणेश जीव वाचवण्यासाठी पळत असताना समीर सय्यद याने त्यांच्या पाठीवर चाकूने वार केले. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी इंद्रजित राहिंज मध्यस्थी करण्यासाठी गेला असता, प्रणव दाणे याने त्याच्या चेहर्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गणेश बोरूडे यांच्या जबाबावरून गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.





