अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
2 मार्च रोजी निंबळक (ता. अहिल्यानगर) येथील कोतकर वस्तीमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पसार असलेले दोन संशयित आरोपी अखेर एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अत्यंत धाडस व शिताफीने केलेल्या कारवाईत पोलिसांनी या दोघांना नाल्यातून पाठलाग करून अटक केली.
2 मार्च रोजी सायंकाळी कोतकर वस्तीतील गणेश किराणा स्टोअर्ससमोर सशस्त्र टोळक्याने अचानक हल्ला चढवला. फिर्यादी राजेंद्र पोपट कोतकर (वय 41, रा. कोतकर वस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संदीप कोतकर याने उसने दिलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून संतोष धोत्रे व त्याच्यासोबत आलेल्या आठ साथीदारांनी संदीप व त्याच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात विलास कोतकर, कोंडीबा कोतकर, चंद्रभागा कोतकर हे जखमी झाले होते.
सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी ताहेर मुन्ना शेख (वय 20, रा. ढवणवस्ती, हडको) व यश भगवान बुटटे (वय 21, रा. कजबे वस्ती, सावेडी) हे पसार होते. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी बुरूडगाव रस्त्यावरील पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात येणार होते. पोलिसांनी त्वरित सापळा रचून परिसरात घेराव घातला. पोलिसांना पाहताच संशयित आरोपींनी नाल्यात उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अंमलदार शिवाजी मोरे यांनी शिताफीने पाठलाग करून दोघांनाही अटक केली. ही कामगिरी सहायक निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोंढे, अंमलदार सचिन आडबल, राजेंद्र सुद्रीक, नवनाथ दहिफळे, अक्षय रोहोकले, मोरे आणि राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.