नाशिक | प्रतिनिधी
शहरातील सहा ‘शिक्षित’ व्यावसायिक, उद्योजक, सेवानिवृत्तनागरिकांना सायबर संशयितांनी टार्गेट करुन ‘स्टॉक मार्केट’ मधून अधिक नफा देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी ४३ लाख ७७ हजार रुपये उकळले आहेत. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल असून फसवणुकीतील सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम हजारो बँक खात्यातून इतरत्र वर्ग झाल्याचे समोर आले आहे.
फिर्यादीनुसार, १६ जून २०२५ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत ही फसवणूक झाली. संशयितांनी फिर्यादीसह पाच साक्षीदारांना विविध भारतीय व विदेशी मोबाईल क्रमांक, तसेच व्हॉट्सॲप व इंटरनेट कॉलिंगच्या माध्यमातून संपर्क साधला. ‘Puppy Rally 32’ या कथित स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मबाबत माहिती दिली.
त्यानंतर गुगल प्ले स्टोअरवरील lover.clock.runtime com.klsmepks.dalinoye हे ‘ॲप्स’ डाऊनलोड करण्यास भाग पाडले. या ॲप्सद्वारे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत अधिकचा नफा मिळेल, असा दावा केला. त्यासंबंधी काही गुंतवणुकीवर ॲपमध्ये ‘नफा’ झाल्याचे आकडे दाखवण्यात आले. त्यामुळे तक्रारदारांचा विश्वास बसल्यानंतर संशयितांनी टप्प्याटप्प्याने अधिक रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. नफा काढण्यासाठी ‘चार्जेस’, ‘टॅक्स’, ‘क्लिअरन्स’, ‘सीएचसीपी सपोर्ट फी’ अशा विविध कारणांनी पुन्हा पुन्हा पैसे वर्ग करण्यास सांगितले. नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत असून, ‘स्टॉक मार्केट’ हे सध्या सायबर गुन्हेगारांचे प्रमुख लक्ष्य ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पैसे वळविण्याची क्लृप्ती
फिर्यादीसह साक्षीदारांकडून रक्कम विविध बँक खात्यांमध्ये, तसेच आंतरराष्ट्रीय ‘पेमेंट गेट वे’ द्वारे जमा करून घेण्यात आली. काही रक्कम थेट विदेशी क्रमांकांशी जोडलेल्या सपोर्ट सिस्टीममार्फत घेतली गेली. पैसे भरल्यानंतरही नफा खात्यात जमा न होता उलट आणखी रक्कम भरण्याचा तगादा लावण्यात आला. यात साधारणत: हजारांहून अधिक बाेगस बँक खात्यांतून ‘ट्रॅन्झॅक्शन’ झाल्याचे समाेर येते आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सहा जणांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
महत्त्वाचे मुद्दे
गुगल प्ले स्टोअरवरील ॲप असल्याने विश्वास बसला
सुरुवातीला ‘नफा दाखवून’ सापळ्यात अडकविले
विदेशी क्रमांकांचा वापर करून गुंतवणूक विश्वासार्ह भासवली
अनेक खात्यांत पैसे वळवून तपास गुंतागुंतीचा
सायबर पोलिसांचे आवाहन
-अधिक नफ्याची हमी देणाऱ्या ॲपवर विश्वास ठेवू नका
-गुंतवणूक करण्यापूर्वी SEBI नोंदणी तपासा
-अनोळखी लिंक, ॲप किंवा सपोर्ट नंबरपासून सावध राहा
फसवणूक झाल्यास cybercrime.gov.in वर तक्रार करा





