जामखेड | प्रतिनिधी | Jamkhed
जामखेड शहरातील बीड रोडवरील हॉटेल कावेरी या ठिकाणी हॉटेलची तोडफोड करत केलेल्या गोळीबारात हॉटेल मालक रोहित अनिल पवार (वय 27) हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच चारचाकी गाडीची देखील तोडफोड केली आहे. मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी गोळीबार केला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जखमीस तातडीने उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्यावर गुन्हा करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी रात्री हॉटेल मालक पवार हा हॉटेलवर होता. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सात ते आठजणांच्या टोळीने हॉटेलवर येत हल्ला केला हॉटेलची आणि चारचाकी वाहनाची तोडफोड केली. तसेच पवार याच्यांवर गोळीबार केला. यात त्याच्या पायाला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. आरोपी हल्लाकरुन पळून गेल्यानंतर घटनास्थळाहुन जखमीस तातडीने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून आजुबाजुचे काही सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले.
मागील भांडणाच्या कारणावरून हा गोळीबार झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी अहिल्यानगर येथून फॉरेन्सिक टीम दाखल झाली. घटनास्थळी गावठी कट्ट्याचे अवशेष सापडले आहेत. याप्रकरणी दोन संशयितांसह इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनकडुन सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे, जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली आहे.




