उंबरे |वार्ताहर| Umbare
साधूच्या वेशात आलेल्या तीन भामट्यांनी एका महिलेला भुरळ पाडून घरातील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे दि. 28 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. प्रभावती मधुकर संसारे, (वय 45 वर्षे), रा. कुक्कडवेढे या सकाळी 10.30 वाजे दरम्यान त्यांच्या घरात एकट्याच होत्या. त्यावेळी तेथे साधुच्या वेशात तीन जण आले व म्हणाले की, भिक्षा वाढा. तेव्हा प्रभावती संसारे यांनी त्यांना वीस रुपये भिक्षा दिली. त्यांतर ते भामटे म्हणाले की, मावशी आम्हाला चहा प्यायचा आहे. तुम्ही आम्हाला चहा करा. असे म्हणून साधुच्या वेशात भगवे कपडे घातलेले भामटे घराच्या बाहेर ओट्यावर बसले. त्यानंतर प्रभावती संसारे यांनी चहा करुन त्या तीन साधुंना दिला. चहा पिल्यानंतर एका भामट्याने त्याच्या खिशातून रुमाल काढला आणि प्रभावती संसारे यांच्या तोंडासमोर झटकला. त्यावेळी प्रभावती संसारे यांना भुरळ आल्याने त्या ओट्यावरच बसल्या. तेव्हा एक भामटा घरात गेला आणि थोड्या वेळाने बाहेर आला. नंतर साधुचे वेशात असलेले तीन भामटे पसार झाले.
या दरम्यान भामट्यांनी संसारे यांच्या घरात घुसून घरात असलेल्या कपाटातील सोन्याचा सर, मनिमंगळसूत्र, अंगठी, कानातील झुबे व मंचली असे सुमारे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागीने चोरुन नेले. काही वेळाने प्रभावती संसारे यांचे पती घरी आले असता घरात घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी प्रभावती मधुकर संसारे यांच्या फिर्यादीवरून साधूच्या वेशात आलेल्या तीन भामट्यांवर गु.र.नं. 375/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.