Sunday, September 29, 2024
Homeनगरधक्कादायक! मारहाण करत काढली अर्धनग्न धिंड

धक्कादायक! मारहाण करत काढली अर्धनग्न धिंड

एमआयडीसी पोलिसांची गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉड, लोखंडी कोयता, कुर्‍हाडीच्या दांडक्याने मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्याची धक्कादायक घटना एमआयडीसीच्या नवनागापूर परिसरात घडली. मारहाण झाल्यानंतर अल्पवयीन मुले नातेवाईकांसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद नोंदवून घेतली गेली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, त्या अल्पवयीन मुलांना मारहाण करत त्यांची अर्धनग्न धिंड काढणार्‍या व्यक्तीची फिर्याद एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ नोंदवून घेतली असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

मारहाणीत जखमी झालेल्या दोन अल्पवयीन मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करताना व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एमआयडीसी लगत असणार्‍या नवनागापूर परिसरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या घरी काही तरूण सोमवारी (24 जून) दुपारी गेले होते. त्यांनी त्या मुलासह त्याची आई, आजी व अल्पवयीन मित्राला रॉड, कोयता, दांडक्याने मारहाण केली. त्यांच्या आणखी एका मित्राला मारहाण करण्यात आली. अल्पवयीन मुलाच्या शेजारी राहणार्‍या महिलेला देखील तुझा मुलगा कुठे आहे, असे म्हणून अत्याचार करून मारून टाकण्याची धमकी दिली. त्या तरूणांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

त्यांना अज्ञातस्थळी घेऊन जात पुन्हा रॉड, कोयता, दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून धमकी दिली. त्यांच्या अंगावरील कपडे उतरून त्यांची धिंड काढली. मारहाणीत हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. मारहाणीचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले. मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले असता तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या घटनेची दखल घेतली नाही. जखमींची फिर्याद नोंदवून घेतली नाही. त्यांना रूग्णालयात जाण्यास सांगितले. जखमी जिल्हा रूग्णालयात गेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान, मारहाण करणार्‍या राहुल मारूतीराव पाटील (वय 29 रा. शिवाजीनगर, नवनागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी सायंकाळी 7:21 वाजता चौघां अल्पवयीन मुलांविरूध्द मारहाण, शिवीगाळ, दमदाटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मला मारण्याकरीता कोणी सुपारी दिली’, असे विचारले असता चौघांनी लांकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ दुसर्‍या दिवशी (मंगळवारी) सोशल मीडियावर व्हायरल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना याची माहिती मिळाली व अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली व घडलेला प्रकार सांगितल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या जबाबावरून 13 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. राहुल पाटील, प्रशांत वंजारे, करण काळे, प्रवीण गिते, विशाल काटे, विशाल कापरे, हर्षल गायकवाड, सोनु शेख, आर्यन शेवाळे, सागर दारकुंडे, सुरज शिंदे, रोहित (पूर्ण नाव नाही), पप्पु पगारे (सर्व रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांची मुजोरी
अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांची धिंड काढण्याचा गंभीर प्रकार एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडल्यानंतर त्या नातेवाईकांनी पोलिसांना ठाण्यात जाऊन माहिती दिली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी व अंमलदारांनी त्यांना रूग्णालयात जाण्यास सांगितले. याव्यतिरिक्त त्यांची कुठलीच दखल घेतली नाही. धक्कादायक बाब म्हणजे मुलांना मारहाण होत असताना मारहाण करणारे तरूण एका पोलीस अंमलदाराच्या संपर्कात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याउलट मुलांना मारहाण करणार्‍यांची फिर्याद तात्काळ दाखल करून घेतली. एकाला एक न्याय व दुसर्‍याला एक न्याय अशी भूमिका एमआयडीसी पोलिसांची असल्याचे दिसून येते.

मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारहाण झाल्यानंतर ते पोलीस ठाण्यात आले होते. त्यांना रूग्णालयात जाण्यास सांगितले. सोमवारी आमचे कर्मचारी जबाब घेण्यासाठी गेले होते त्यांनी जबाब दिला नाही. मंगळवारी जबाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे. त्या मुलांना जास्त मार लागल्यामुळे रूग्णालयात जाण्यास सांगितले म्हणून गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला. त्यांना मारहाण करणार्‍याचा आधी गुन्हा दाखल केला आहे.
– एपीआय माणिक चौधरी, एमआयडीसी पोलीस ठाणे.

- Advertisment -

ताज्या बातम्या