अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर तालुक्यातील एका गावात घरात घुसून कुटुंबातील सदस्यांवर मारहाण, महिलांवर लज्जास्पद वर्तन आणि सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आठ जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 वर्षीय युवकाने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या फिर्यादीवरून मुनाफ चाँद शेख, इखलास मुनाफ शेख, इमरान चाँद शेख, मुजफ्फर चाँद शेख, मुजाहीद हबीब शेख, सरफराज हबीब शेख, साहिल जलील शेख, अदिल जलील शेख यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, 25 जून रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपींनी एकत्र येऊन हल्ला केला. घटनेच्या दिवशी मुनाफ व इखलास यांनी फिर्यादीच्या भावाला तुम्ही आमच्या व्यवसायाची माहिती पोलिसांना दिली असा आरोप करत मारहाण केली.
त्यानंतर आठही संशयित आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड, फायटर आणि दगड घेऊन फिर्यादीच्या घरात घुसखोरी केली. घरात घुसून त्यांनी फिर्यादी, त्यांच्या आई आणि आजी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. मुजफ्फरने फिर्यादीच्या डोक्यावर दांडक्याने, साहिलने पाठीवर फायटरने, तर अदिलने पायावर लोखंडी रॉडने मारहाण केली. महिलेशी तिघांनी मारहाण करत अत्यंत लज्जास्पद वर्तन केले आणि त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र व कानातील अर्धा तोळ्याचे टॉप जबरदस्तीने काढून घेतले.
हल्लेखोरांनी घरावर दगडफेक करत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच तुम्हाला या मोहल्ल्यात राहू देणार नाही अशी धमकी दिली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.





