अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मित्राला वाचविण्यास गेलेल्या एका युवकावर कोयता, लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला केल्याची घटना सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील पडका महाल परिसरात घडली आहे. सक्षम पदमाकर नवघरे (वय 18, रा. भूषणनगर, केडगाव, अहिल्यानगर) असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. जबाबावरून सात जणांविरूध्द सोमवारी (6 ऑक्टोबर) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जॉय सोनवणे, अनुज बोरूडे, जॉकी ऊर्फ धिरज, साहिल दर्कर, अमन वाबळे, पिंट्या बकासुर व भोर्या (पूर्ण नावे, पत्ता माहिती नाहीत) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, रविवारी (5 ऑक्टोबर) दुपारी 12.46 वाजता सक्षमला त्याचा मित्र नयन खेचे याचा फोन आला. नयन यास पडका महाल, बारस्कर टपरी येथे मारहाण झाल्याची माहिती त्याने दिली. यावरून सक्षम तात्काळ दुचाकीवरून तेथे पोहोचला असता नयन खेचे हा मारहाणीत जखमी अवस्थेत होता.
सक्षमने नयनला आपल्या दुचाकीवर बसवून तेथून निघण्याचा प्रयत्न केला असता, त्याचवेळी नयनवर हल्ला करणारे संशयित आरोपी पुन्हा तेथे आले. आरोपींनी तु आम्हाला ओळखत नाहीस, तुला आज संपवतो असे म्हणत सक्षमवर कोयता, लोखंडी रॉड व दगडाने हल्ला केला, शिवीगाळ करत दगडाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात सक्षम जखमी झाले असून, त्यांचे मित्र ऋषिकेश गजभरे व सचिन गारूडकर यांनी त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर पोलिसांनी सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.





