पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
शहरातील एका दुकानात मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्याचा प्रकार घडला. याप्रकरणी गणेश राजेंद्र भोसले याच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची अल्पवयीन मुलगी मेडिकल दुकानात औषध घेण्यासाठी गेले असताना, आरोपीने मुलीचा विनयभंग केला. मुलीने याबाबत तात्काळ आपल्या आईला सांगितले व ती रडू लागली.
फिर्यादी महिलेने आरोपीला जाब विचारला असता, त्याने दारूच्या नशेत शिवीगाळ करत जातीचा उल्लेख करून अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि तिथून निघून गेला. घटनेनंतर फिर्यादी महिलेने आपल्या पतीला बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपी गणेश राजेंद्र भोसले याच्याविरुद्ध मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव गुट्टे करीत असून त्यांना पोलीस कॉन्स्टेबल एजाज सय्यद सहकार्य करीत आहेत.