नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जुलै महिन्यात शहरात (July Month) कुठेना कुठे दररोज एक घरफोडीची घटना घडली असून त्यात चोरट्यांनी तब्बल ७८ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. यातील केवळ एक ते दोनच किरकोळ घरफोड्यांची (Burglary) उकल झाली असून सुरु असलेली ‘स्टॉप अँन्ड सर्च’ मोहिम केवळ एक फार्स असल्याचे अधोरेखित होत आहे.
शहरातील तेरा पोलीस ठाण्यात (Police Station) सर्वच आलबेल सुरु असून गेल्या काही दिवसांत कलेक्शनसह विशेष जबाबदाऱ्या सांभाळण्यासह व गिळंकृत करण्याच्या प्रकारातून थेट पोलीस निरीक्षक व अंमलदारांच्या टेबलाखालील बदलीकांडाचे पितळं उघडे पडले होते. वरिष्ठांची मर्जी राखण्यासह हद्दीतील अवैध धंदे व वसुलीवर पकड मिळविण्यासाठी काही अंमलदारांनी (कलेक्टर्स) एकमेकांवर चाल करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे परिमंडळ दोनमध्ये नवीन पोलीस उपायुक्त म्हणूण नुकताच चार्ज घेतलेल्या किशोर काळेसमोर अंतर्गत धुसफुशीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान आहे.
त्यात यश मिळते की नाही हे भविष्यात दिसणार आहेच, पण दुसरीकडे परिमंडळ दोनच्या हद्दीत गुन्हेगारांच्या टोळ्या एकमेकांवर गावठी पिस्तूलांतून सर्रास ‘क्रॉस फायर’ करत आहे. पंचवटी परिसरातही तिच स्थिती आहे. अशातच, नित्यनियमित घडणाऱ्या जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांची केवळ पोलीस दप्तरी नोंद होत आहे. या गुन्ह्यांचे डिटेक्शन (उकल) बाजूलाच पडून आहे. त्यामुळे घरफोडीची फिर्याद देऊन तपासासाठी महिने न् महिने पाठपुरावा करुन पिडलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
त्यातच विशेष करुन दोन्ही परिमंडळात चोरी व घरफोडीचे गुन्हे अनडिटेक्ट असून पोलिसाच्या अशा कार्यशैलीवर टिकेची झोड उठत आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत सर्वाधिक ३६ घरफोडीच्या घटना अंबड आणि मुंबईनाका (अनुक्रमे सात) पोलिसांच्या हद्दीत घडल्या आहेत. त्याखालोखाल उपनगर आणि पंचवटीचा समावेश आहे. येथे अनुक्रमे चार घरफोडी झाल्या आहेत. किरकोळ घरफोड्यांचा तपास लागला असून ज्या गुन्ह्यात जास्त प्रमाणात रक्कम व दागिन्यांचा (jewelry) समावेश आहेत, ते गुन्हे अद्यापही तपासावरच आहे.
‘एकच मोड्स’ आणि त्यांची किमान अपेक्षा
शहरातील ३६ घरफोड्यांची प्रकरणे बारकाईने अभ्यासली असता, जवळपास पाचहून अधिक गुन्ह्यांत चोरट्यांनी घरफोडींसाठी ‘एकसारखीच पद्धत’ अवलंबल्याचे दिसते. त्यामुळे या घटनांतील चोरटे व त्यांची टोळी कनेक्टेड असण्याचा दाट संशय आहे. त्यामुळे या एकूणत घरफोडींची उकल झाली तर तक्रारदारांना किमान ‘फुल नाही पण पाकळी’ तरी मिळण्याचे समाधान लाभू शकते.
पोलीस गायब, नाईट पेट्रोलिंगचे काय ?
ज्या अधिकाऱ्यांकडे घरफोडी प्रकरणांचे तपास आहेत ते बहुतांश अधिकारी संबंधित तक्रारदारांना ‘तपास सुरु आहे’, असे सांगून मोकळे होत आहे. वरिष्ठांकडून दाखल गुन्ह्यांच्या कारवाईचा नियमित आढावा घेतला जात नसल्याने बहुतांश गुन्ह्यांची उकल बाकी आहे. मोठ्या कष्टाने कमविलेले दागिने व रक्कम रातोरात गायब होत असल्याने स्वतःला नाईटकिंग म्हणविणारे पोलीस ठाण्यांचे गुन्हेशोध पथक प्रकरणांच्या सेटलमेंटमध्येच व्यस्त असल्याचा आरोप होतो आहे. अनेक भागात मनमर्जी पेट्रोलिंग होत असल्याचे सध्या दिसत असून त्यामुळेच चोरट्यांचे फावत आहे. त्यातून ‘घरफोड्या उदंड आणि डिटेक्शन थंड’ म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
दृष्टिक्षेपात
- निर्भया, बीटमार्शल, व्हिजीबल पोलिसिंगची चर्चाच
- नाईटराऊंडदरम्यान मध्यरात्री गुन्हेगारांचा मुक्तवावर * पोलीसांचे ‘खबरी’ भूमिगत
- टीप मिळत नसल्याने शोधाचे प्रमाण नगण्य
- पेट्रोलिंग तोकडी पडत असल्याने चोरी घरफोडी वाढल्याचा अंदाज
- डीबी व गुन्हे पथकांकडून नागरिकांचा भ्रमनिरास
- विशेष कार्यवाही नाहीच
- उपनगर, मुंबईनाका व अंबड हॉटस्पॉट




