
नाशिक | प्रतिनिधी
बिटको हॉस्पिटलजवळील सुमीत पगारेवरील गोळीबार व खून प्रकरणात (Sumeet Pagare Murder Case) नाशिक रोड पोलिसांनी (Nashik Road Police) तपासाचा फास अधिक आवळला असून या गुन्ह्यातील संशयितांची संख्या आता वीसवर पोहोचली आहे. मुख्य संशयित राजीक शेख याला हत्येसाठी वापरलेला गावठी कट्टा पुरवणाऱ्या साहिल शेख याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्याला २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या कटातील मुख्य दुवा मानले जाणारे जमीर रंगरेज आणि राजू शेख हे दोघे अद्याप पसार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. गेल्या वर्षी एमडी ड्रग्ज तस्करी व विक्रीच्या एनडीपीएस गुन्ह्यात तुरुंगात असताना मुख्य संशयित अर्जुन पिवाल व मन्ना गांगुर्डे यांच्यासोबत पगारे बंधूंचा वाद झाला होता. त्याच वैमनस्यातून व भागात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रविवारी (दि. १६) गोसावीवाडी परिसरात सुमित पगारेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुमित भाटीया यांच्या फिर्यादीवरून सुरुवातीला १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या हत्येमागील शस्त्रास्त्रांचे जाळे समोर आले आहे:
राजिक शेख याने हातात हात मिळवण्याचा बहाणा करून सुमितवर दोन गोळ्या झाडल्या होत्या. तर, साहिल शेख याने मुख्य संशयित राजीक याला गावठी कट्टा पुरवविल्याचे तपासात समोर आले आहे. तर, जमीर रंगरेज व राजू शेख हे पसार असून साहिलने हा गावठी कट्टा या दोघांकडून आणला होता, असे निष्पन्न झाले आहे. जमीर आणि राजू शेख यांना अटक झाल्यानंतरच हा गावठी कट्टा मूळ कुठून खरेदी केला होता, याचा पर्दाफाश होणार आहे.




