पिंपळनेर | वार्ताहर | Pimpalner
धुळे जिल्ह्यातील (Dhule District) पिंपळनेर (Pimpalner) येथे आनंदोत्सवासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हल्ल्याने हादरले. पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान झालेल्या चाकू हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास घडली.
हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वादाची ठिणगी पेटलेली होती. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव वाढला होता. त्यातूनच लग्नस्थळी अचानक कुरापत काढून धारदार शस्त्राने हल्ला (Attack) करण्यात आल्याचे सांगितले जाते.
या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५) सुरेशगीर मोजगीर गोसावी (वय ५५) व साहील सुरेश गोसावी (२२) यांचा, उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. तसेच पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे जखमी झाले असून, त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल करण्यात आले. गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हल्ल्याप्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्षु शंभू गोसावी यांच्यावर आरोप करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. लग्नसोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान विजय गोसावी यांच्या मुलीच्या लग्नासाठी आले व आज साखरपुडा होतांना ही घटना घडली.





