नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात तोतया पोलीस (Fake Police) बनून ज्येष्ठ महिला व निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या इराणी गँगला (Irani Gang) अखेर जोरदार झटका बसला आहे. नाशिकरोड गुन्हे शाखेने (Nashik Road Crime Branch) आंबिवली (ता. कल्याण) येथे पहाटे सापळा रचत सराईत जाफर मालिक सय्यद उर्फ संजू इराणी (वय ५३) या सराईतास अटक केली. त्याच्याकडून तब्बल १८ लाख रुपये किमतीचे १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले असून, शहरातील ‘पोलीस बतावणी’च्या एकूण १० गुन्ह्यांची उकल झाली आहे.
संजू इराणी हा ठाणे जिल्ह्यातील (Thane District) अटाळी गावातील रहिवासी असून तो साथीदारांसह शहरात फिरत असायचा. स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून, “तपास सुरू आहे”, “सोनं सुरक्षित ठेवा” अशा सबबी सांगत नागरिकांच्या अंगावरील दागिने काढून घेत काही क्षणांत हातचलाखीने बनावट पिशवी देत खरे दागिने लंपास करण्याचा डाव खेळत होता. विशेषतः ज्येष्ठ महिलांना एकटे पाहून त्यांना गंडा घालण्याची पद्धत त्याने अवलंबली होती.
गेल्या काही दिवसांत उपनगर, इंदिरानगर व नाशिकरोड परिसरात अशा प्रकारचे गुन्हे वाढले होते. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे संशयित आंबिवलीत लपल्याचे निष्पन्न झाले. तो दररोज पहाटे ४ ते ५ दरम्यान रेल्वे स्थानक परिसरात येत असल्याची खात्री पटताच प्रभारी उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शहरातील विविध भागांत साथीदारांसह गुन्हे केल्याची कबुली दिली.
दरम्यान, इराणी गँगच्या इतर साथीदारांचा शोध सुरू सहरातील नागरिकांनी (Citizen) अशा तोतया पोलिसांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस ओळखपत्राची खातरजमा केल्याशिवाय कोणालाही दागिने किंवा मौल्यवान वस्तू देऊ नयेत, असेही स्पष्ट केले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. टीएडब्ल्यूच्या सहायक निरीक्षक जया तारडे, नाशिकरोड क्राईम युनिटचे प्रभारी व उपनिरीक्षक संदीप पवार, ग्रेड पीएसआय प्रेमचंद गांगुर्डे व त्यांच्या पथकाने कामगिरी बजावली.
अहमदाबाद कनेक्शन उघड
चोरीतील काही दागिने गुजरातमधील अहमदाबाद येथे विकल्याचे तपासात समोर आले. पोलीस पथकाने तेथे जाऊन दागिने जप्त केले. उर्वरित दागिने आंबिवली परिसरातून हस्तगत करण्यात आले. एकूण १८ लाख रुपयांचे १२३ ग्रॅम सोने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, उपनगर (२), इंदिरानगर (५) व नाशिकरोड (३) पोलीस ठाण्यांतील एकूण १० गुन्ह्यांची उकल या अटकेमुळे झाली आहे.




