अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कोठला परिसरात राहणार्या एका मजुराला सहा जणांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (1 एप्रिल) रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली. शमसोद्दीन जलील शेख (वय 44 रा. कोठला, छोटे इमाम सवारी जवळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरदीन तन्वीर शेख, अल्ताफ बंड्या शेख, फरीद तन्वीर शेख, साहील तन्वीर शेख, मोईन तन्वीर शेख आणि अकील शकील शेख (सर्व रा. कोठला झोपडपट्टी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी हे आपल्या मुलांसह कोठला येथे राहतात. त्यांची पत्नी गेल्या 10 वर्षांपासून माहेरी राहत असून ते मजुरी करून आपल्या मुलांचा सांभाळ करतात. मात्र, त्यांच्या गल्लीत राहणारे काही युवक त्यांना सातत्याने त्रास देत असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. मंगळवारी रात्री 10.30 वाजता, फिर्यादी हे कुरेशी हॉटेलच्या मागील बाजूस चहा पित असताना फरदीन शेख याने त्यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. त्यानंतर अल्ताफ बंड्या शेख आणि फरीद तन्वीर शेख यांनी देखील त्यांना मारहाण केली.
तसेच, इतर संशयित आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आणि पोलिसांत तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फिर्यादीच्या जबाबानुसार, पोलिसांनी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील अांधळे करत आहेत.