Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारजिल्ह्यात मद्यपी वाहन चालकाविरुध्द् ५९ गुन्हे दाखल

जिल्ह्यात मद्यपी वाहन चालकाविरुध्द् ५९ गुन्हे दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार जिल्ह्यात मद्यपी वाहन (Driver) चालकाविरुध्द् (police) पोलीसांनी धडक मोहीम राबवित ५५२ वाहन चालकांची तपासणी करुन ५९ गुन्हे दाखल केले आहे.यापुढे ही अशी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगीतले.

- Advertisement -

नाशिक (nashik) परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी रस्ते अपघाताच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता बरेचशे गुन्हे हे वाहन चालकाच्या चुकीमुळे विशेषतः मद्यप्राशन करुन वाहन चालविल्यामुळे झाले असल्याचे आढळून आले .

त्यामुळे संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात दारु पिऊन वाहन चालविणार्‍यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांना आदेश दिले होते . त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत दारु पिऊन वाहन चालविणार्‍या वाहन चालकांविरुध्द दि.१८ जून रोजी रात्री ८ ते रात्री ११ वाजे दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते .

या विशेष मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत एकुण २० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती . नाकाबंदी दरम्यान एकुण ५५२ चारचाकी व दुचाकी मोटरसायकल चालकांची तपासणी केली असता , त्यात ५९ वाहन चालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळून आले . त्यामुळे त्यांच्या विरुध्द्

नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे – १० , उपनगर पोलीस ठाणे येथे – ४ , नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे – ४ , नवापुर पोलीस ठाणे येथे – ११ , विसरवाडी पोलीस ठाणे येथे – ६ , शहादा पोलीस ठाणे येथे- ४ , धडगांव पोलीस ठाणे येथे ३ , म्हसावद , सारंगखेडा , अक्कलकुवा , तळोदा पोलीस ठाणे येथे प्रत्येकी २ गुन्हे , मोलगी पोलीस ठाणे येथे ३ , शहर वाहतुक शाखेमार्फत ६ गुन्हे असे एकुण ५९ गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले .

या विशेष मोहिमेत दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने ( लायसन्स ) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्या कार्यालयात पाठविण्यात येणार असून लवकरच त्यांच्यावर परवाने ( लायसन्स ) निलंबनाची कारवाई करण्यात येईल व भविष्यात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे .

नाकाबंदीसाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्रीकांत घुमरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व १५ दुय्यम अधिकारी तसेच १०७ पोलीस अमंलदार यांनी सहभाग घेतला .

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की , दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे . नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे . तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून परवाने ( लायसन्स ) निलंबित करण्याबाबतची कारवाई भविष्यातही अशीच सुरु राहील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले .

- Advertisment -

ताज्या बातम्या