अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूसांसह रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी (3 जून) पोलिसांनी ही कारवाई केली. क्लेरा बुश ग्राउंड येथे एक इसम काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. यानंतर निरीक्षक दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
आदेशानुसार उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, एका इसमास कमरेला काहीतरी धातूचे शस्त्र लावून संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्या इसमास जागीच पकडून अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 40 हजार 600 रूपये किमतीचा गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा (पिस्तुल) व तीन जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासात त्याने त्याचे नाव बिरज्या उर्फ बिरजु राजू जाधव (वय 29 रा. कोठी, पाटील हॉस्पिटल मागे, अहिल्यानगर) असे सांगितले. त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सेदवाड करीत आहेत.
दरम्यान बिरज्या जाधव हा आधीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्याविरूध्द विविध पोलीस ठाण्यांत एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. सदर कारवाई उपनिरीक्षक सेदवाड, अंमलदार विशाल दळवी, रोहिणी दरंदले, दीपक रोहकले, तानाजी पवार, सुरज कदम, सचिन लोळगे, राम हंडाळ, महेश पवार, प्रतीभा नांगरे यांच्या पथकाने केली.




