– ज्योत्स्ना पाटील
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
तुम्ही सर्वजण नक्कीच उत्सुक असाल कारण ‘पद्मावत’ चित्रपट, दीपिका पदुकोण आणि घुमर घुमर घुमे या गाण्याचा आणि आमच्या अभ्यासाचा काय संबंध! हे जाणण्यासाठी. चला तर मग मुलांनो, तुम्ही गाणे पाहिलेच आहे आणि त्यातल्या तुम्हाला दिसणार्या गोष्टींची यादीही केली असेलच. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल यादी का करायला सांगितली? अर्थात, ते तुमच्या लक्षात येईलच.
मुलांनो, चित्रपट म्हणताच प्रथम विचार येतो तो करोडो रुपयांचा. करोडो रुपये अभिनेता-अभिनेत्री कमावतात, त्यामुळे चित्रपटात खूप पैसा मिळतो, असे वाटणे साहजिक आहे. पण एक चित्रपट निर्माण होण्यासाठी हजारो हात रात्रंदिवस खपत असतात. तेही दोन-दोन, तीन-तीन वर्षे. तेव्हा कुठे एक चांगली कलाकृती आपल्याला पाहायला मिळत असते. दोन अडीच तासांच्या चित्रपटासाठी जर एक निर्माता, दिग्दर्शक करोडो रुपये खर्च करून हजारो लोकांना सोबत घेऊन दोन-तीन वर्षे मेहनत घेतात आणि शेवटी निकाल! चित्रपट हिट होईल की फ्लॉप होईल? ते सर्वस्वी प्रेक्षकांवर अवलंबून असते.
‘घुमर घुमर घुमे’ या गाण्यासाठी निवडलेले ठिकाण, राजमहालाची निवड, राजमहालात ठेवण्यात आलेल्या वस्तू, पडदे, प्रकाश योजना, दिवे, अभिनेत्रीची वेशभूषा, इतर स्त्रियांची वेशभूषा (त्यात कपडे, दागिने व मेकअप) अशा अनेक गोष्टींची तयारी करण्यात येते ती एका गाण्यासाठी. या सर्व गोष्टी तर दृश्य स्वरुपातील झाल्यात. याच्या पाठीमागे असणार्या अदृश्य गोष्टींची तर तुम्ही कल्पनाही केली नसेल. अदृश्य स्वरुपातील बाबी नृत्य करणारी अभिनेत्री ही नुकतेच लग्न करून आलेली राणी आहे. तीही राजस्थानी समाजातील. तिचा वेष तेथील राणीला शोभेल असा. तोही भरजरी, वजनदार व योग्य रंगसंगती असलेला असावा. राणीचे दागिने डोक्यापासून पायापर्यंत असावेत. घागरा व ओढणीदेखील विशिष्ट लांबी-रूंदीची असावी लागते. राणी नृत्य करते तेव्हा कोणाही पुरुषाला प्रवेश नसतो. वाद्य वाजवणारे वादकही पडद्यामागे, तेही पाठ करून उभे असतात. या गाण्यासाठी वापरण्यात येणारी वाद्ये ही राजस्थानीच असावी लागतात. जर एका गाण्यासाठी इतकी मेहनत घेणे आवश्यक आहे तर मग मुलांनो, मला सांगा तुमच्या जीवनाची इमारत ज्या अभ्यासरुपी पायावर उभी राहणार आहे तो पाया किती भक्कम असायला हवा हे तुम्हाला या गाण्याच्या पूर्वतयारीवरून नक्कीच लक्षात आले असेल.
संजय लीला भन्साळी यांच्यासारखे शेकडो दिग्दर्शक झोकून देऊन एकच ध्यास घेतात. तसाच ध्यास विद्यार्थ्यांनी घेतला तर अभ्यास कटकट न वाटता आनंददायक होईल. मुलांनो, अशा गोष्टी डोळ्यासमोर आणल्यात की आपल्यातही आपले काम चोखपणे करणे सहज शक्य होत असते. गाण्याशी संबंधित अजून बरेच काही जाणून घेणार आहोत पण ते पुढच्या लेखात. बघूया गाण्यातून तुम्हाला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते की नाही.
तुमची,
ताई