नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
युरोपमधील प्रमुख विमानतळांवर सायबर हल्ला झाल्यामुळे शनिवारी लंडनच्या हीथ्रो, ब्रुसेल्स आणि बर्लिनसह अनेक महत्त्वाच्या विमानतळावर चेक-इन आणि बोर्डिंग प्रणाली विस्कळीत झाली. या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली आहे. चेक इन आणि बोर्डिंग प्रणालीवर याचा परिणाम झाला असून यामुळे विमानांचे उड्डाण रद्द झाली आहे किंवा त्यांना उशीर झाला आहे. यामुळे विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
यूकेमधील एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. “तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे चेक-इन आणि बोर्डिंग प्रणालीवर परिणाम झाला आहे. सायबर हल्ल्याच्या शक्यतेमुळे विमानतळावरील सेवा ठप्प झाली आहे”, अशी माहिती बेल्जियममधील ब्रुसेल्सच्या विमानतळ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली.
या सायबर हल्ल्यात कॉलिन्स एरोस्पेस या कंपनीला लक्ष्य करण्यात आले होते. ही कंपनी जगभरातील अनेक विमान कंपन्यांना चेक-इन आणि बोर्डिंगसाठीचे सॉफ्टवेअर पुरवते. कंपनीच्या माहितीनुसार, सॉफ्टवेअरमध्ये ‘सायबर-संबंधित बिघाड’ झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक चेक-इन आणि बॅगेज ड्रॉप-ऑफ सेवा बंद पडल्या आहेत. कंपनीने तातडीने मॅन्युअल ऑपरेशन सुरू केले असून, दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हा सायबर हल्ला शुक्रवारी रात्री (१९ सप्टेंबर) सुरू झाला आणि शनिवारी सकाळपर्यंत सर्वत्र पसरला आहे.
इतर युरोपियन विमानतळांनीही तांत्रिक समस्या उभी राहिल्याचे म्हटले आहे. ब्रुसेल्स विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, तेथील १० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच १७ विमानांना एक तास किंवा त्यापेक्षा अधिकचा उशीर होऊ शकतो. ही तांत्रिक समस्या कधी सोडवली जाईल, हे आताच सांगता येणार नसल्याचेही विमानतळ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
या हल्ल्यामुळे एअर इंडियानेही आपल्या प्रवाशांना सूचना जारी केली आहे. हीथ्रो विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेक-इन प्रक्रियेत विलंब होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी वेब चेक-इन करूनच विमानतळावर पोहोचावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
बर्लिन विमानतळाने त्यांच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे या समस्येची माहिती दिली आहे. “युरोपमधील विमानतळावरील संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे चेक-इनसाठी जास्त वेळेची प्रतिक्षा करावी लागत आहे. आम्ही यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत”, असे संकेतस्थळावरील संदेशात म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





