नाशिक । प्रतिनिधी Nashik
ऑडॅक्स क्लब पॅरिसियन आयोजित पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस (पीबीपी) या जागतिक सायकल स्पर्धेत नाशिकच्या सायकलपटूंनी यश मिळवत फ्रान्समध्ये भारताचा डंका वाजवला.
पॅरिसमध्ये झालेल्या रॅन्डोनिअर या स्वयंआधारित 1220 कि. मी. ब्रेव्हेट स्पर्धेत जगभरातून आठ हजार तर भारत देशातून 280 सायकलपटू सहभागी होते. त्यात नाशिकचे आठ सायकलिस्टसनी या स्पर्धेचे आव्हान स्वीकारले. ही 1220 किलोमीटरची सायकल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 90 तासांचा कालावधी दिला जातो. नाशिकचा अल्ट्रा सायकलपटू विभव शिंदे याने केवळ 67 तास 51 मि. व 06 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत भारत देशातून चौथा तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
भगूर येथील रहिवासी गणेश कुंवर या अल्ट्रा सायकलिस्टने 73 तास 46 मि. 33 सेकंदात स्पर्धा पूर्ण करून भारतातून बारावे स्थान पटकावले. नाशिक सायकलिस्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष आयर्न मॅन किशोर काळे यांनी 87 तास 20 मिनिटे 20 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. नाशिकचे रेडिओलॉजिस्ट डॉ. राहुल सोनवणी यांनी 87 तास 59 मि. 32 सेकंदात ही स्पर्धा यशस्वी पूर्ण केली. संगमनेर येथील रहिवासी विजय काळे यांनी 88 तास 12 मिनिटे 41 सेकंदात पूर्ण केली. आयर्न मॅन नीलेश झवर यांनी शेवटपर्यंत झुंज देऊन फिनिश लाईन निर्धारित वेळेच्या काही तास उशिरा पूर्ण केली.
या स्पर्धेत नाशिकच्या महिला सायकलिस्ट डॉ. अनिता लभडे यांनी 1017 कि.मी. अंतर पूर्ण केले. मानेचा प्रचंड त्रास होत असल्यामुळे ही स्पर्धा थोड्या अंतरासाठी सोडावी लागली. आयर्न मॅन नीता नारंग यांनी ब्रेस्टपर्यंतचे अर्धे अंतर पार करून पुढच्या चेक पॉईंटला पोहोचल्या. त्यानंतर गुडघ्याची सूज वाढली व वेदना सहन न झाल्याने ही स्पर्धा सोडावी लागली. या अष्टपैलू सायकलपटूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले व भारताचा तिरंगा पॅरिसमध्ये अभिमानाने फडकवला. त्याबद्दल नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या सदस्यांनी एकच जल्लोष केला. तसेच हा आनंद वात्सल्य वृद्धाश्रम येथील विशेष आजी-बाबांसोबत केक कापून व मिठाई वाटप करून साजरा केला.