Tuesday, May 7, 2024
Homeअग्रलेखअनाठायी धाडस नकोच

अनाठायी धाडस नकोच

अखेर बिपरजॉय चक्रीवादळ सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्याला धडकून राजस्थानकडे सरकले. तेथून पुढे त्याचा प्रवास सुरु राहील. त्यामुळे व्हायचा तो उत्पात झाला. वादळ धडकण्याआधी समुद्रात लाटांनी रौद्र रूप धारण केले होते. लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर आढळत होत्या. वादळाआधीच्या निसर्गाच्या रौद्ररूपाची दृश्ये वाहिन्यांवर सतत दाखवली जात होती. अनेक वाहिन्यांचे प्रतिनिधी देखील समुद्रकिनाऱ्यावर, काही जण पाण्यात उभे राहून वार्तांकन करत होते. हे देखील त्यांचे अनाठायी धाडस मानावे का? वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या वृत्तातील एक दृश्य चित्त विचलित करणारे माणसाच्या अनाठायी धाडसाचे होते. ते गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावरचे होते. वादळाचे इशारे दिले जात होते. माणसांनी समुद्रकिनारी आणि समुद्राच्या पाण्यात जाणे टाळावे असे आवाहन सातत्याने केले जात होते.

काही ठिकाणी सरकारने तात्पुरती बंदी देखील घातली होती. पण लोकांच्या अती उत्साहाने त्या इशाऱ्यांमधील गांभीर्य नष्ट करून टाकले. लोक समुद्राच्या पाण्यात खोलवर जात होते. जणू काही वादळाचे इशारे त्यांच्यासाठी नव्हतेच. वेगवान लाटांच्या माऱ्याने अनेक पर्यटक जखमी झाल्याचेही वृत्त दाखवले गेले. माणसे असे का वागत असावीत? माणसे लोकलच्या दारांना लटकतात. रेल्वेच्या दारात बसून प्रवास करतात. बंदी असतानांही धरणाच्या पाण्यात पोहायला उतरतात. प्रशिक्षण घेतलेले नसतानाही गडकिल्यांच्या कडयांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतात. खोली माहित नसतांनाही धबधब्याच्या पाण्यात उड्या मारतात. हेच अती धाडस माणसाच्या जीवावर बेतू शकते. अनेकदा तशा दुर्दैवी घटना घडल्याही आहेत. घडत आहेत. नुकतीच अशी दुर्घटना खडकवासला धरणाच्या पाण्यात घडली. विद्यार्थ्यांच्या सहली देखील संकटात सापडतात. पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळी पर्यटनाचे दिवस आहेत. धोक्याच्या ठिकाणी फलक लावलेले असतात. धबधब्यांना कठडे बांधलेले असतात. अनेक ठिकाणी प्रवेश बंदी असते. तथापि त्याकडे कानाडोळा करण्याची सवय समाजात मुरली आहे. नव्हे असे अनाठायी धाडस हेच युवा पिढीचे लक्षण मानले जात आहे. ते करणारा ‘कुल’मानला जातो. त्यालाच इतरेजन हिरो समजतात. अडनिड्या वयातील मुले त्यांचेच अनुकरण करतात. तीन जण दुचाकी चालवत रील बनवतात. कड्याच्या टोकावर उभे राहून छायाचित्रे काढतात. त्यात अनेकांचे जीवही जातात. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ अशी मराठी म्हण आहे. पण या बाबतीत कित्येकांना ठेचा लागल्या पण माणसे शहाणी व्हायला तयार नाहीत. वाट्टेल तसे वागून माणसे त्यांचा जीव धोक्यात घालतात आणि तसे झाले त्यांचा जीव वाचवण्यासाठी सामाजिक संस्थांनी परिश्रम घ्यावेत, सरकारने मदत जाहीर करावी हेच त्यांना अपेक्षित असावे का? माणसांच्या अती धाडसामुळे घडणाऱ्या दुर्दैवी घटनांचा दोष बऱ्याचदा सरकारच्या माथ्यावर मारला जाताना आढळतो. कोणत्याही नियमाला माणसे जुमानत नसतील तर तो दोष सरकारचा म्हणावा का? विचार करणे, तर्कसंगती लावणे, हित आणि अहित यांची समज ही माणसाची वैशिष्ट्ये. त्यांचा योग्य वापर करायला माणसे शिकतील का? अती धाडस टाळायला शिकतील का? आयुष्य जगण्यासाठी माणसे किती धडपडतात. व्यायाम करतात. आहार आणि विहार सांभाळतात. आरोग्य धोक्यात आले तर बरे होण्यासाठी पाण्यासारखा पैसे खर्च करतात. मग माणसाला त्याच्या आयुष्याची किंमत नाही असे तरी कसे समजावे? तरीही माणसे एका क्षणाला बेभान होऊन स्वतःचे आयुष्य उधळून टाकायला कसे तयार होऊ शकतात? गरज आहे ती अती उत्साहाला आवर घालण्याची आणि थोडासा विचार करण्याची. तसा तो यापुढे तरी केला जाईल अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या