नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी 28 मे रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (03 जून) डी.के. शिवकुमार यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी समारंभादरम्यान शिवकुमार यांनी हातात संविधानाची प्रत घेऊन पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. डॉ. जी. परमेश्वर यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शिवकुमार यांना बंगळुरू येथील ‘लोक भवन’मधील ‘ग्लास हाऊस’मध्ये सायंकाळी ४:१० वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दक्षिण भारतात काँग्रेसचे ‘संकटमोचक’ म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे शिवकुमार हे सिद्धरामय्या यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त मंत्रिमंडळ विस्ताराचा भाग म्हणून आणखी १२ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांच्या नावाचाही समावेश आहे.
३० मे रोजी बंगळुरू येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (CLP) बैठक पार पडली. या बैठकीत डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. २८ मे रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या सिद्धरामय्या यांनीच पक्षनेतेपदासाठी डी. के. शिवकुमार यांच्या नावाची शिफारस केली होती.
या नेत्यांनी घेतली शपथ
काँग्रेस नेते के. एच. मुनियप्पा, के.जे. जॉर्ज, एम.बी. पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोळी, कृष्णा बायरे गौडा, प्रियांका खर्गे, यू.टी. खादर, ईश्वर खंड्रे, यतींद्र सिद्धरामय्या, बायराथी सुरेश आणि डॉ. शरण प्रकाश पाटील यांनी डी.के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली.
RBI ने खरचं १२ अब्ज डॉलर्सचं सोन विकलं? केंद्र सरकारने दिली अधिकृत माहिती
काँग्रेस नेते उपस्थित
राज्याचे नेतृत्व करण्याची शिवकुमार यांची दीर्घकाळापासूनची आकांक्षाही पूर्ण झाली आहे. या प्रतिष्ठित शपथविधी समारंभाला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, तसेच काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. शपथविधी समारंभाला उपस्थित असलेल्या सिद्धरामय्या यांनीही, शिवकुमार यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले.
अशी आहे डी. के. शिवकुमार यांची कारकीर्द
डी. के. शिवकुमार यांनी 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला एक विद्यार्थी नेता म्हणून केली. 1979 मध्ये जेव्हा देवराज अर्स आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्ष सोडला, तेव्हा तत्कालीन विद्यार्थी नेते असलेले शिवकुमार यांनी काँग्रेसमध्ये आपले स्थान भक्कम केले आणि पक्षात स्वतःचे एक स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यश मिळवले. 1985 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस-समर्थित विद्यार्थी संघटना असलेल्या ‘एनएसयूआय’ने त्यांना विद्यार्थी निवडणुकांसाठी उमेदवारी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे याच काळात भाजप नेते अनंत कुमार यांनी डी. के. शिवकुमार यांना भाजपच्या ABVP सामील करून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर 1985 मध्ये डी. के. शिवकुमार यांना सथानूर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एच.डी. देवेगौडा यांच्या विरोधात आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, 1989 मध्ये डी. के. शिवकुमार यांनी म्हैसूर जिल्ह्यातील सथानूर मतदारसंघातून आपली पहिली निवडणूक विजय नोंदवला आणि ते विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले.




